श्रीनगर: बुरहान वानी या दहशतवाद्याच्या खात्म्यानंतर 48 दिवसांपासून काश्मीर धुमसत आहे. त्यामुळे धुमसत्या काश्मीरची पाहाणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह काश्मीर दौऱ्यावर आहेत. काश्मीरमधील सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, आज त्यांनी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, हीच देशवासीयांची इच्छा असल्याचे स्पष्ट केले.

 

राजनाथ सिंहांनी यावेळी काश्मीरमधील जनतेला शांततेचं आवाहन करून, चकमकी बंद झाल्या पाहिजेत. तसेच तरुणांना चिथवणी देणाऱ्यांचे चेहरे समोर आणले पाहिजेत, असे आवाहनही केले.

 

'' ज्याकाळात 12-14 वर्षीय मुलांच्या हातामध्ये कॉम्प्यूटर आणि पेन असण्याची गरज आहे, त्याकाळात ते बंदूक उचलत आहेत. नव्या पिढीतील तरुणांची माथी कोण भडकवत आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे,'' असे ते यावेळी म्हणाले.

 

''आम्ही काश्मीरच्या मुलांचे भविष्य भारताच्या मुलांप्रमाणेच असावे यासाठी प्रयत्नशील आहोत. पण जे लोक काश्मीरमध्ये अशांतता पसरवू पाहात आहेत, त्यांचे चेहरे काश्मीरच्या जनतेने उघडे पाडावेत,''असे आवाहनही त्यांनी यावेळी काश्मीरच्या जनतेला केले.