भदोही (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या भदोहीमध्ये भाजप आमदारासह सात जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा बुधवारी दाखल झाला आहे. रविंद्रनाथ त्रिपाठी असं या भाजप आमदाराचं नाव आहे. वाराणसी येथील रहिवाशी असलेल्या पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आपल्याविरोधात हे राजकीय षडयंत्र असल्याचं भाजप आमदाराने म्हटलं आहे.


पोलीस अधीक्षक राम बदन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने 10 फेब्रुवारीला याबाबत तक्रार दाखल केली आहे. भाजपचे आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी आणि त्यांचे निकटवर्तीय संदीप, सचिन, चंद्रभूषण, दीपक, प्रकाश आणि नितेश यांनी आपल्यावर एक-एक करुन हॉटेलमध्ये बलात्कार केला. तसेच महिनाभर हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याचा आरोपही या महिलेने आरोप केला आहे. त्यानंतर गर्भवती राहिली असता आरोपींनी जबरदस्तीने आपल्याला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोपही महिलेने केला आहे.





या संपूर्ण प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. महिलेने केलेले आरोप आणि इतर चौकशीच्या आधारावर पोलिसांनी भाजप आमदार रविंद्रनाथ त्रिपाठीसह सात जणांवर आयपीसी कलम 376 ड, 313, 504, 506 गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेच्या वैद्यकीय चाचणीनंतर आणि न्यायालयात तिचा जबाब नोंदवून झाल्यानंतर या प्रकरणाची पुढील कार्यवाही केली जाईल, त्यामुळे तुर्तास आरोपींना अटक केली नाही, असं पोलीस अधीक्षक राम बदन सिंह यांनी सांगितलं.