मुंबई : सोशल मीडियाच्या वर्तुळात व्हायरल होणाऱ्या गोष्टी, व्हिडीओ, फोटो, विषय यांची मोजणी करणंही अवघड. दर दिवशी असंख्य गोष्टी व्हायरल होणाऱ्या याच सोशल मीडियाच्या वर्तुळात सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे 'बॉर्डर' या चित्रपटातील एका गाण्याची.


आता या चित्रपटाच्या लोकप्रियतेबाबत वेगळं काही सांगण्याची करज नाही. पण, त्यातही आता त्यातील बहुचर्चित आणि कमालीचं गाजलेलं 'संदेसे आते है', हे गाणं नव्यानं सादर करण्यात आलं आहे. खुद्द बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिलाही या गाण्याच्या नव्या व्हर्जनची भुरळ पडली आहे.

गिटारच्या तालावर एक मुलगा आणि मुलगी हे गाणं गाताना दिसत आहेत. त्यांचा आवाज या गाण्याला वेगळाच टच देत आहे. हे गाणं आणखी खास ठरण्यामागचं कारण ठरत आहे ते म्हणजे हा व्हिडीओ चित्रीत करण्यात आलेलं ठिकाण. व्हिडीओमध्ये दोन्ही कलाकारांची वेशभूषा आणि त्यांच्या मागे असणारा पर्वतीय भाग पाहता ते लडाख भागातील असल्याचं पाहताक्षणी लक्षात येत आहे. अर्थात, याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, तरीही नेटकऱ्यांनी मात्र तर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

In Pics | नवं वर्ष, नवं घर; करीनाच्या आलिशान आशियान्याची एक झलक


अनेकांनीच हा व्हिडीओ रिट्विट आणि रिशेअर केला आहे, कित्येकांनी कमेंट करत त्यात दिसणाऱ्या दोन्ही गायकांची प्रशंसा केली आहे. काहींनी सध्या सुरु असणाऱ्या सीमावादाच्या प्रश्नाशी हा मुद्दा जोडत ल़डाखी नागरिकांच्या भावनांना सलाम केला आहे. या व्हिडीओच्या निमित्तानं पुन्हा एकदा भारतात असणारी विविधतेतील एकताच अधोरेखित होत आहे. इतकंच नव्हे, तर असं कौशल्य असणारी तरुणाई प्रकाशझोतापासून वंचित का राहते, असा प्रश्नही काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.