काही दिवसांमध्ये बिहारमध्ये निवडणूक होणार असल्याने राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. साहजिकच निवडणूक आयोगाकडूनही याची तयारी सुरू आहे. कोरोना काळात डोर टू डोर कँपेनिंग करताना उमेदवार आपल्या सोबत जास्तीत जास्त 5 लोकांना नेऊ शकणार आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक सभा आणि रोड शो ला परवानगी देण्यात आली आहे.
कोरोना काळात अनेक ठिकाणी नवे नियम येत असताना आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही या काळात निवडणूक पार पाडण्यासाठी विशेष नियमावली जाहीर केली आहे. दारोदारी प्रचार करताना एकावेळी पाचच लोकांना जाण्याची मुभा, रोड शो करताना उमेदवारांच्या वाहन ताफ्यात प्रत्येक 5 गाड्यानंतर सोशल डिस्टन्सिंगची आवश्यकता असे अनेक नियम आयोगानं जाहीर केले आहेत. राजकीय पक्ष आणि इतर घटकांच्या सूचनांचा विचार करुन ही नियमावली बनवली असल्याचं आयोगानं सांगितलं. या काळात विधानसभेची पहिली मोठी निवडणूक बिहारमध्ये अपेक्षित आहे. बिहार विधानसभेचा कालावधी 29 नोव्हेंबरला संपतोय, त्या पार्श्वभूमीवर ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
पाहुयात काय काय नवे नियम आयोगानं जाहीर केले आहेत.
- उमेदवाराचा अर्ज भरताना त्याच्यासोबत केवळ दोनच व्यक्तींना जाण्यास परवानगी.
- मतदान करायला गेल्यावर तिथे कोरोनाची लक्षणं दिसल्यास मतदाराला एक टोकन देऊन परत पाठवलं जाईल, सर्वात शेवटी त्याचं मतदान नोंदवलं जाईल
- मतदान कक्षात रजिस्टरवर सही करण्यासाठी, ईव्हीएमचं बटण करण्यासाठी मतदाराला ग्लोव्हजची व्यवस्था केली जाईल.
- सर्व मतदारांनी चेहऱ्याला मास्क लावूनच मतदानाला यावं, फक्त मतदान कक्षात प्रवेश करण्याआधी त्यांना मास्क काढून ओळख पटवावी लागेल. रांगेत उभं राहतानाही सोशल डिस्टन्सिंगनं राहावं लागेल.
- एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1 हजार लोकांचंच मतदान ठेवलं जाईल, याआधी ही मर्यादा दीड हजार इतकी होती. कोरोना काळात कमी गर्दीसाठी हा उपाय केला जाईल.
- मतदानाच्या प्रचारासाठी एखादं मैदान निश्चित करताना तिथे प्रवेश आणि निर्गमनाचे वेगवेगळे मार्ग आहेत का याची खात्री केली जाईल. मैदानावर लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे मार्किंग करुनच बसवलं जाईल.
- कोविड काळात जितक्या लोकांना परवानगी आहे, त्यापेक्षा अधिक लोक या सभेला एकत्रित येणार नाहीत यावर निवडणूक अधिकारी बारकाईनं लक्ष ठेवतील.
- पोस्टल बॅलेटची सुविधा ही अपंग, 80 वर्षांपेक्षा अधिक वृद्धांसह कोविड पेशंट, होम क्वारंन्टाईन झालेले संशयित यांनाही दिली जाईल.
E PASS to be cancelled | राज्य सरकार ई-पासची अट रद्द करण्याच्या विचारात