नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली. दोन देशांच्या सर्वोच्च नेत्यांमधील चर्चेबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि ब्रिटन संबंधांना व्यापक भागीदारीसाठी आम्ही एक महत्वाकांक्षी रोडमॅप 2030 स्वीकारला आहे. 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पटीपेक्षा अधिक करणे उद्दीष्ट असलेला एक व्यापक एफटीए रोडमॅप स्वरुपात एक व्यापार भागीदारी सुरू करण्याचे आम्ही स्वागत केले आहे. आरोग्य, तंत्रज्ञान आणि उर्जा यासह नवीन महत्त्वपूर्ण बाबींवरही सहमती दर्शविली आहे. 






वर्धित व्यापार भागीदारीचा भाग म्हणून, लवकर लाभ व्हावा यासाठी  अंतरिम व्यापार कराराचा विचार करण्यासह सर्वसमावेशक आणि संतुलित एफटीएबाबत वाटाघाटी  करण्याच्या योजनेवर  भारत आणि ब्रिटन यांनी सहमती दर्शवली. भारत आणि ब्रिटन यांच्यात वाढीव व्यापार भागीदारीमुळे दोन्ही देशांमध्ये हजारो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील.


सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अदर पुनावाला यांनी ब्रिटेनमध्ये गुंतवणूक केली आहे. भविष्यात ब्रिटेनमध्येच कोरोना लसीची निर्मितीही सुरु करणार असल्याची माहिती बोरिस जॉनसन यांनी दिली आहे.






दोन्ही नेत्यांनी कोविड 19  परिस्थिती आणि लसीबाबत  यशस्वी भागीदारीसह महामारी विरूद्धच्या लढ्यात सुरू असलेल्या सहकार्याबद्दल चर्चा केली. भारतात कोविड 19 च्या दुसऱ्या तीव्र लाटेच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने तत्काळ वैद्यकीय मदत पुरवल्याबद्दल  पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान जॉन्सन  यांचे आभार मानले. पंतप्रधान जॉन्सन  यांनी गेल्या वर्षभरात ब्रिटन  आणि इतर देशांना औषधे  आणि लसींचा पुरवठा करण्यासह विविध प्रकारे  मदत पुरवण्यात भारताच्या भूमिकेचे कौतुक केले.