मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशातील अनेक राज्यांत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अनेक राज्यांत उपचाराअभावी रुग्णांचे जीव जात आहे. अशातच एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. वैज्ञानिकांच्या हाती कोरोनाचा असा म्युटेंट लागला आहे, जो इतर स्ट्रेनपेक्षा 10 पट अधिक संसर्गजन्य आहे. या म्युटेंटमुळे देशातील काही भागात थैमान सुरु झाले असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
संशोधकांनी अशा कोरोना विषाणूचा शोध लावला आहे, जो संसर्ग पसरवणाऱ्या इतर सर्व स्ट्रेनपेक्षा सध्या 10 पट अधिक संसर्गजन्य आहे. या म्युटेंटचे नाव 'N440K' आहे. संशोधकांना असे दिसून आले की या म्युटेंटमुळे देशातील काही भागात दुसर्या लाटेचा वेग अनियंत्रित झाला आहे.
पहिल्यांदा आंध्र प्रदेशमध्ये मिळाला म्युटेंट
पहिल्यांदा आंध्र प्रदेश राज्यात 'N440K' हा कोरोनाचा म्युटेंट आढळून आला. आता हा नवीन विषाणू आंध्र आणि तेलंगणासह देशाच्या बर्याच भागात वेगाने पसरत आहे. दुसर्या लाटेदरम्यान आंध्र आणि तेलंगणातील सर्व नवीन कोरोना रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण या नवीन विषाणूमुळे बाधित झाले आहेत. हा विषाणू महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या काही भागातही आढळल्याचा दावा करण्यात येत आहे.
घाबरुन जाण्याची गरज नाही : तज्ञ
'N440K' या कोरोनाच्या नवीन म्युटेंटला घाबरुन जाण्याची गरज नसल्याचे मत काही तज्ञांनी व्यक्त केलं आहे. सेल्युलर अणि आण्विक जीवविज्ञान केंद्र (CCMB) चे सल्लागार राकेश मिश्रा म्हणाले की, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि तेलंगणा येथील 20-30 टक्के नमुन्यांमध्ये आढळलेला N440K नवीन विषाणूचा परिणामा येत्या आठवड्यात कमी होईल. मात्र, या काळात लोकांनी कोरोना नियमांचे पालन करायला हवे. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता पाळणे आवश्यक आहे.
कोरोना विषाणू स्वतःत बदल करत असून आतापर्यंत देशात काही नवीन स्ट्रेन आढळले आहेत. तज्ञ डबल म्युटेंट आणि विषाणूच्या पटर्नवर अभ्यास करीत आहेत. दुसऱ्या लाटेत कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण शोधण्यासाठी ते अनेक नमुन्यांचा अभ्यास करीत आहेत. कर्नूल शहर आणि N440K व्हेरीएंटमध्ये काही लिंक आहे का? हे देखील शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.