Viral Video: आपल्या युक्तीवादाने अनेकांचा घाम फोडणाऱ्या वकिलांना आज एका बिबट्यानं घाम फोडला. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद (Ghaziabad) न्यायालयाच्या आवारात संध्याकाळच्या सुमारास एक बिबट्या घुसला आणि एकच धावपळ उडाली. या बिबट्याने पाच जणांवर जीवघेणा हल्ला केला. अडीच तासाहून अधिक वेळ या आवारात धुमाकूळ घालणाऱ्या या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद केलं आहे.  बिबट्याच्या या हल्ल्यात या आवारात बूट पॉलिश करणारा एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


बिबट्या आत शिरताच न्यायालयाच्या जुन्या इमारतीतील सर्व  खोल्या रिकाम्या करण्यात आल्या. संपूर्ण कोर्टात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. न्यायालयाच्या आवारात उपस्थित असलेले वकील आणि इतरांनी कसंतरी आपला जीव वाचवला आणि या परिसरातून बाहेर पडले. न्यायालयाच्या आवारात अडीच तासांहून अधिक काळ बिबट्याने उच्छाद मांडला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. 


व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन वकील बिबट्याला पकडण्यासाठी फावडे आणि काठी घेऊन इमारतीच्या आवारात फिरत असल्याचं दिसून येत आहे. तिसरा वकील त्याचा व्हिडीओ बनवत आहे. या दरम्यान बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्याचवेळी त्या वकिलांनाही बिबट्यावर उलट हल्ला केला. 


 






न्यायालयाच्या आवारात बिबट्या दाखल झाल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने वनविभागाचे 12 सदस्यीय पथक बचावासाठी दाखल झाले. पथकाने जाळी आणि पिंजरे सोबत आणले होते. 


प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, "सीजेएम न्यायालयाच्या इमारतीत तळमजल्यावर दुपारी 4.15 वाजण्याच्या सुमारास बिबट्या पहिल्यांदा दिसला. नंतर त्याने या परिसरातील लोकांवर हल्ला केला.  त्यानंतर हा बिबट्या न्यायालयाच्या लिफ्टमध्ये शिरला. नंतर तो इमारतीच्या वरच्या मजल्यावरही गेला. या घटनेच्या समोर आलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये तो बिबट्या इमारतीच्या लोखंडी ग्रीलच्या काठावर बसलेला दिसत आहे. 


या घटनेत 15 हून अधिक न्यायाधीश सुमारे अर्धा तास इमारतीत अडकले होते. बिबट्या आल्याची बातमी मिळताच आपापल्या कोर्टात कार्यरत असलेल्या 15 हून अधिक न्यायाधीशांनी कार्यालयाच्या आत जाऊन गेट बंद केले. सुमारे अर्ध्या तासानंतर पोलिस इमारतीत दाखल झाले आणि त्यानंतर  बंदोबस्तात सर्व न्यायाधीशांना इमारतीबाहेर काढण्यात आलं.


ही बातमी वाचा: