एबीपी माझाची संलग्न वाहिनी एबीपी न्यूजने या व्हायरल दाव्याची पडताळणी केली आहे.
1974 मध्ये पोखरणमध्ये आण्विक चाचणी करुन भारताने संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवून दिली होती. आता 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा रोखण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या. यानंतर सोशल मीडियावर सोनम गुप्ताचं एक रहस्य समोर आलं. आता तुम्ही विचार करत असाल की या दोघांमध्ये काय संबंध? पण संबंध आम्ही नाही तर सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या एका मेसेजने जोडला आहे.
व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, ज्या पद्धतीने आण्विक चाचणीच्या गुप्त ऑपरेशनचा कोडवर्ड होता, त्याचप्रकारे नोटाबंदीचाही कोडवर्ड होता. या कोडवर्डचं नाव होतं, "सोनम गुप्ता बेवफा है."
देशात मोठ्या निर्णयांसाठी नेहमीच कोणता ना कोणता कोडवर्ड ठेवला जातो. 1974 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पोखरणमध्ये आण्विक चाचणी केली होती, तेव्हा 'बुद्धा स्मायलिंग' असा कोडवर्ड होता.
व्हायरल मेसेजमधील दाव्यानुसार, नोटाबंदीची योजना गुप्त ठेवण्यासाठी एका कोडवर्डचा वापर केला होता, जेणेकरुन या प्लॅनशी संबंधित लोकांशिवाय इतर कोणालाही याची माहिती मिळू नये. जसा पोखरण आण्विक चाचणीचा कोडवर्ड "बुद्ध हसतो आहे" हा होता, तसाच नोटाबंदीचा कोडवर्ड "सोनम गुप्ता बेवफा है" होता.
व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये कोडवर्डचा अर्थही समजावण्यात आला आहे.
- सोनम – संपत्ती (मोठ्या नोटा)
- गुप्ता – गुप्त (काळा पैसा)
- बेवफा आहे – रद्द होणार आहे
500, 1000 च्या नोटा बंद झाल्यानंतर बऱ्याच नोटांवर सोनम गुप्ताची कहाणी लिहिण्यात आली. त्यानंतर सोनम गुप्ता कोण आहे, कुठे राहते, तिने कोणाचा प्रेमभंग केला, तिच्यावर बेवफाईचा आरोप करणारा प्रेमवीर कोण? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नोटाबंदीनंतर सोनम गुप्ताची कहाणी 10 रुपयांच्या नोटांपासून सुरु झाली होती, जी 2 हजाराच्या नव्या नोटा आणि डॉलरपर्यंत लिहिण्यात आली. पण सोनम गुप्ताचं रहस्य उलगडलं नाही. आता व्हायरल मेसेज विश्वासार्ह बनवण्यासाठी 1974 च्या कोडवर्डसह सोनम गुप्ताचाही कोडवर्ड बनवला आहे. जर हा मेसेज खरा असेल, तर सोनम गुप्ता नावाची कोणतीही मुलगी बेवफा नाही. तो फक्त नोटाबंदीचा कोडवर्ड आहे.
नेटीझन्स फेसबुकवर झपाट्याने हा मेसेज शेअर करत आहेत. वशिष्ठ शुक्लाने त्याच्या फेसबुक वॉलवर लिहिलं आहे की, "पोखरण आण्विक चाचणीचा कोडवर्ड 'बुद्धा स्मायलिंग' होता. त्यामुळे 'सोनम गुप्ता बेवफा है' कोडवर्ड काळ्या पैशांबाबत तर नाही?"
बिबाश चंद्र झा याने हा मेसेज शेअर करताना लिहिलं आहे की, "मेसेजमधील ही गोष्ट खरी असल्याचं वाटतंय. कदाचित या सफाईमुळे काहींचं आयुष्य सुधारेल."
व्हायरल मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही दोन गोष्टींची तपासणी केली. एक म्हणजे नोटाबंदीसाठी खरंच कोडवर्ड होता की नाही? दुसरी गोष्ट म्हणजे जर कोडवर्ड होता तर तो सोनम गुप्ताच्या नावावर तर नाही?
एबीपी न्यूजच्या माहितीनुसार, नोटाबंदींचा निर्णय लागू करण्यासाठी सरकारने कोणताही कोडवर्ड बनवला नव्हता. जर कोडवर्डच नव्हता तर सोनम गुप्ताच्या नावावर कोडवर्ड बनवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याची घोषणा केली होती. काळ्या पैशांवर लगाम लावण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं मोदींनी सांगितलं होतं. पण यात कोणत्याही प्रकारचा कोडवर्ड असण्याला दुजोरा मिळत नव्हता. नोटाबंदीचा निर्णय काही लोकांनाच माहित होता, असंही मोदींनी सांगितलं होतं.
भारताने दोन आण्विक चाचण्या केल्या. एक 1974 मध्ये इंदिरा गांधींच्या काळात आणि दुसरी 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात झाली होती. व्हायरल मेसेजमध्ये ज्या 'बुद्धा स्मायलिंग' बाबत बोललं जात आहे, तो कोडवर्ड 1974 च्या चाचणीसाठी होता.
देशात नोटाबंदीनंतर लोकांना आपापल्या मनानुसार अनेक गोष्टी तयार केल्या. काहींनी मोदींचं कौतुक केलं आहे तर काहींनी सामान्यांना होत असलेल्या त्रासाचा हवाला दिला आहे. सोनम गुप्ताच्या बेवफाईच्या कहाणीतील नवा ट्विस्ट मजेसाठी घेतला आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हायरल मेसेज चुकीचा असल्याचं सिद्ध झालं आहे.