नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदीमागील हेतू योग्य असला, तरी तो या निर्णयाने साध्य होणार नाही, असं स्पष्ट मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी राज्यसभेत व्यक्त केलं.
"नोटबंदीनंतरच्या सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे देशभरात 60 ते 65 जणांना जीव गमवावा लागला. या निर्णयामुळे छोटे उद्योग, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पंतप्रधानांनी योग्य नियोजन करुन नोटाबंदीच्या योजनेची अंमलबजावणी करायला हवी होती", असं मनमोहन सिंह म्हणाले.
मनमोहन सिंहांचा मोदींना सवाल
तुमच्या खात्यात पैसे कितीही भरु शकता, मात्र पैसे काढू शकत नाही, अशी परिस्थिती सध्या भारतात आहे. जगात असा कोणता देश आहे, जिथे पैसे भरु दिले जातात पण काढू दिले जात नाहीत? हे पंतप्रधानांनी सांगावं, असा सवाल मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला.
नोटंबदीचा घेतलेला निर्णय हा संघटित लुटीसारखा आहे, असा हल्लाबोलही मनमोहन सिंहांनी केली.
जनतेचा त्रास कमी होण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने योग्य ती पावलं उचलावी, असं आवाहनही मनमोहन सिंहांनी केलं.
ग्रामीण भागाला जोडणारं सहकार बँकिंग क्षेत्र ठप्प आहे. या निर्णयामुळे छोटे उद्योग, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मोदींनी जनतेला तातडीने दिलासा द्यावा, असं मनमोहन सिंह म्हणाले.