मुंबई: यंदाच्या दिवाळीपूर्वी देशात सर्वत्र चायनिज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं जात आहे. दिवाळीनिमित्त सोशल मीडियावरुन पंतप्रधान मोदींचे एक पत्रही कमालीचं व्हायरल होतंय. या पत्राद्वारे, चायनिज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन खुद्द पंतप्रधानांनी केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना असे कोणतं आवाहन केलंय का? याचं व्हायरल सत्य जाणून घेऊ या.

वास्तविक, या पत्राची चर्चा होण्याची दोन कारणे आहेत. एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रं, आणि दुसरं दिवाळीनिमित्त मोदींचं आवाहन. या पत्राद्वारे पंतप्रधानांनीच चायनिज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केल्यानं, अश्चर्य व्यक्त होतंय.

सोशल मीडियावरील हे पत्र वाचून अनेकजण विचारात पडले आहेत. कारण पंतप्रधानांनी अशी कोणतं आवाहन केलंय का? कारण, सध्या सोशल मीडियावरुन चायनिज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची एक मोहीमच सुरु आहे. या मोहीमेत पंतप्रधानांच्या नावच्या पत्राचाही आधार घेतला जात आहे.

गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे पंतप्रधानांचे हे आवाहन खरं असल्याचं अनेकांना वाटत आहे. त्यामुळे एबीपी न्यूजच्या टीमने याची सत्यता पडताळली आहे.

या पत्रात पंतप्रधानांच्या नावाने लिहलं आहे की, ''माझ्या प्रिय भारतीयांनो, तुम्ही फक्त इतकं करा! यंदाच्या दिवाळीत आपल्या घरात लायटिंग, सजावटीचे सामान, मिठाई आदींमध्ये भारतीय वस्तू आणि पदार्थांचा वापर करा. तुम्ही सर्वजण या प्रधान सेवकाचं म्हणणं जरुर मानाल, अशी मला अपेक्षा आहे. तुम्हील लहानात-लहान कृतीतून मला सहकार्य कराल तर आपल्या देशाला जगाच्या पटलावर सर्वाच्च स्थानी नेऊन ठेवेन, असं मी वचन देतो. वंदे मातरम्'' विशेष म्हणजे, या पत्रावर पंतप्रधानांचे हस्ताक्षरही दिसतं आहे.

पहिल्यांदा पाहिलं तर, हे पत्र खरं असल्याचं सर्वांनाच वाटतं. मात्र, जे दिसतं ते खरं असेलच असं नाही. पंतप्रधानांच्या या पत्रासंदर्भातील सत्यतेची पडताळणी करण्यासाठी एबीपी न्यूज टीमने पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला, त्यावेळी अशा कोणत्याही प्रकारचं पत्र सार्वजनिक करण्यात आलेलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

म्हणजे, पंतप्रधानांनी अशाप्रकारचं कोसलंही आवाहन देशवासियांना केलं नाही. मात्र सोशल मीडियावरुन हे अशा प्रकारचा खोटा मेसेज प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरुन प्रसारीत होणाऱ्या मेसेजवर कोणीही विश्वास ठेऊ नये असं आवाहन करत आहोत.



एबीपी न्यूजच्या पडताळणीत हे व्हायरल होणारे हे पत्र खरं नसल्याचं सिद्ध झालं आहे.