4 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये चिप शोधण्यासाठी कुठे काप द्यायचे ते सांगण्यात आलं आहे. मंगळयानाच्या चित्राजवळ ब्लेडनं कापत नोट पलटून तिकडेही काप देण्यात आले. ब्लेडनं काप दिल्यानंतर बोटानं त्याठिकाणी घासलं जातं, जिथून चिप बाहेर पडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा ब्लेडनं काप देत नोटेचा काही भाग वर उचलला जातो.
यानंतर नोटेचा वर उचललेला भाग बाजूला काढला जातो. नोटेतील पांढऱ्या रंगाचा चमकणारा भाग कॅमेऱ्याजवळ नेत त्यात काहीतरी असल्याचं भासवलं जातं. तसंच पांढऱ्या भागावर चमकणारी वस्तू हातावर घेत ती चिप असल्याचं सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओनं मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यानंतर एबीपी न्यूजनं या व्हायरल व्हिडीओची सत्यता दाखवली होती. पुन्हा एकदा असाच व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. सोबतच व्हिडीओमध्ये चिप बाहेर काढूनही दाखवली आहे. बीएचयूमध्ये मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचे प्रमुख सत्यव्रत जीत यांनी चिपबाबत खुलासाही केला आहे. त्यांनी मायक्रो चिप केसाच्या पन्नासाव्या भागासमान असल्याचं सांगितलं. तसंच ते त्यापेक्षाही छोट्या असलेल्या नॅनो चिपवर काम करत असल्याचही स्पष्ट केलं. नॅनोचिप मायक्रो चिपच्या पन्नासाव्या भागाएवढी असते.
प्राध्यापक सत्यव्रत जीत यांनी नोटेमध्ये चिप असल्याचा दावा फोल ठरवला आहे. नोटेमध्ये अशी कोणतीही चिप काम करु शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कारण नोटेमध्ये जर चिप लावली तर ती छोटी लावावी लागेल, तीचे सिग्नलही कमी असतील. सोबतच इतक्या साऱ्या नोटांमध्ये चिप लावणं सोपंही नाही.
नोटेमध्ये चिप लावल्यास तीला चार्ज करण्यासाठी आणि उपग्रहाशी जोडून ठेवण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध राहणार नाही असंही सत्यव्रत यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच कोट्यवधी नोटांमध्ये चिप लावून त्यावर नियंत्रण ठेवणंही सोप्पं नसल्याचं त्यांनी सांगितलं.
नोटेत चमकणारी वस्तु काय असा प्रश्न शिल्लक राहातोच. पण सत्यव्रत यांनी तो केवळ एक कागदाचा तुकडा असल्यांचं स्पष्ट केलंय. यापूर्वीही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2000 च्या नव्या नोटेत कोणतीही चिप नसल्याचा खुलासा केला होता.
2000 ची एक नोट छापण्यासाठी सरकारला सध्या 3 रुपये 17 पैशांचा खर्च येतो. मात्र नोटेत चिप लावायची झाल्यास हा खर्च 50 रुपयांहून जास्त असेल, जो सरकारला परवडणारा नसेल.
नोटेमध्ये चिप लावलेली नसल्याचं समोर आल्यानं एबीपी माझाही तुम्हाला अशा व्हिडीओवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत आहे. नोटेत चिप असल्याचा दावा एबीपी न्यूजच्या पडताळणीत व्हायरल असत्य असल्याचं सिद्ध झालं आहे.
पाहा व्हिडीओ :