मुंबई : मुंबईत अरबी समुद्रात बनवण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या मूर्तीबाबत सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. यात प्रामुख्यानं शिवाजी महाराजांच्या मूर्तीमधून मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण करता येऊ शकेल. या विजेपासून मुंबईतील साऱ्या सरकारी कार्यालयांमधील विजेची गरज भागवता येऊ शकेल. तसंच मुंबईवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांपासून ही मूर्ती संरक्षण करेल असंही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एबीपी न्यूजनं या व्हायरल गोष्टींची पडताळणी केली आहे.


नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आलं. या स्मारकाच्या जलपूजनानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवण्यात आल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गोष्टींमधील तथ्य एबीपी न्यूजनं शोधलं आहे.

अरबी समुद्रातील 630 फूट उंचाच्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या माध्यमातून मुंबईचं संरक्षण होणार आहे का? या मूर्तीच्या माध्यमातून तयार झालेली वीज मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना पुरेल का? शिवाजी महाराजांची अरबी समुद्रातील भव्य मूर्ती वीजेचं घर बनेल का? खरंच शिवाजी महाराजांची मूर्ती सूर्यमित्र आणि दहशतवादाचं संहारक होईल का? या साऱ्या प्रश्नांची उत्तर एबीपी माझानं शोधली आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मेसेजमधून काही दावे करण्यात आलेत.



पहिला दावा

शिवाजी महाराजांची अरबी समुद्रातील मूर्ती amorphous silicon, cadmium telluride, आणि copper indium gallium selenide पासून बनलेली आहे. या साऱ्या गोष्टींचा वापर सोलर सेल्स बनवण्यासाठी होतो. आपल्या सरकारनं फिनलँडमधील वरिष्ठ सोलर संशोधक डॉ. इमोनेन किरसी यांचा सल्ला घेतला आहे. त्यांनी केलेल्या या संशोधनाला जवळपास अडीच वर्षांचा काळ लागला.

3 डिसेंबरला त्यांनी पंतप्रधान मोदींना एक खासगी मेलद्वारे या मूर्तीच्या माध्यमातून मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना पुरेल इतकी वीज तयार करता येईल असं सांगितलं आहे. तसंच दहशतवादाचा मुकाबला करण्यास ही मूर्ती सक्षम असल्याचंही स्पष्ट केलंय.
दुसरा दावा

सोशल मीडियावर करण्यात आलेला आणखी एक दावा म्हणजे अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये रॅडिअल यूनिफॉर्म प्रोजेक्शन आणि रेंजिक म्हणजेच RUPAR टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. ही टेक्नॉलॉजी बंगळुरुच्या भारतीय विज्ञान संस्थेत बनवण्यात आली आहे. 2008 मध्ये दहशतवादी समुद्रामार्गे भारतात घुसले होते.

रुपर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवलं जाईल. मात्र खरंच या साऱ्या बाबींमधील तथ्य काय आहे याबद्दल एबीपी न्यूजनं तज्ज्ञांकडून माहिती घेतली.

 काय आहे या दाव्यांमधील तथ्य?

सोलर एक्सपर्टनी दिलेल्या माहितीनुसार वीज बनवण्याचं तंत्रज्ञान सपाट जागेवर राहू शकते. मात्र मूर्तीमध्ये अशाप्रकारचं तंत्रज्ञान वापरणं शक्य नाही.

तर आणखी एक सोलर एक्सपर्ट म्हणाले की, अशाप्रकारे वीजनिर्मिती करता येऊ शकते, मात्र या मूर्तीच्या बाबतीत हे तंत्रज्ञान वापरता येईल की नाही याबद्दल सांगता येणार नाही.

जियालाल जैसवार नावाच्या सोलर एक्सपर्टनी अशाप्रकारचं तंत्रज्ञान मूर्तीमध्ये वापरलं असण्याची शक्यता सरळ नाकारली. सोबतच या मूर्तीचा उद्देश वीज उत्पादन नसल्याचंही सांगितलं.

कोल्हापूरातील  मूर्तीकार राम सुतार यांनी केलेल्या दाव्यानुसार 1000 वर्ष या मूर्तीला कसलाही धोका नाही. मात्र सोलर पॅनेलचं आयुष्य जास्तीत जास्त 10 वर्ष असतं. त्यामुळे मूर्तीत सोलर पॅनेल लागण्याची कोणतीच शक्यता नाही.

त्यामुळे मूर्तीच्या माध्यमातून वीज निर्मिती होण्याची शक्यता नसल्याचं एबीपी न्यूजच्या पडताळणीत स्पष्ट झालं आहे.

तसंच रुपर टेक्नॉलॉजी मूर्तीमध्ये लागली असण्याचं तज्ज्ञांनी अमान्य केलं आहे. अशा प्रकारे मूर्तीच्या माध्यमातून सागरी किनाऱ्यांवर लक्ष ठेवलं जात नाही. तसंच आपलं तटरक्षक दल सागरी किनाऱ्यांचं सरंक्षण करण्यास सक्षम असल्याचंही तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

एबीपी न्यूजच्या पडताळणीमध्ये सोशल मीडियावर केलेले हे दावे व्हायरल असत्य ठरले आहेत.

पाहा व्हिडीओ :