नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यामध्ये त्यांनी देशातील कोरोना व्हायरसच्या स्थितीविषयी चर्चा केली. भारताची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असूनही कोरोना व्हायरस विनाशकारी ठरलेला नाही. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेटही 50 टक्क्यांच्या जवळ आहे. असं असलं तरी आपण अजिबात बेफिकीर राहण्याची गरज नाही. मास्कशिवाय बाहेर जाण्याची कल्पनादेखील करू नये, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, भविष्यात जेव्हा कोरोनाविरूद्धच्या भारताच्या लढाईचा अभ्यास केला जाईल, तेव्हा हे देखील लक्षात येईल की, या काळात आम्ही एकत्र काम केले आणि संघराज्याचे उत्तम उदाहरण दाखवून दिलं.
जगात भारताच्या शिस्तीची चर्चा
जगातील तज्ज्ञ, आरोग्य तज्ज्ञ भारतातील जनतेने लॉकडाऊनदरम्यान दाखवलेल्या शिस्तीविषयी चर्चा करत आहेत. आज भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट 50 टक्क्यांहून अधिक आहे. भारत जगातील त्या देशांमध्ये आघाडीवर आहे, जेथे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की कोरोनाला आपण जितके रोखू, तितके कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे थांबेल. यामुळे आपली अर्थव्यवस्था अधिक पूर्वपदावर येईल. आपली कार्यालये उघडतील, बाजारपेठ उघडतील, वाहतुकीच्या संधी खुल्या होतील आणि रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.
कारखान्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता
आपल्याकडे जे छोट्या कारखाने आहेत, त्यांना मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या दिशेने बरेच काम केले जात आहे, हे मला माहिती आहे. व्यापार आणि उद्योगास त्यांचा जुना वेगाने पकडण्यासाठी, आपल्याला एकत्र काम करावे लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.