Vinoba Bhave Jayanti : आचार्य विनोबा भावे (Acharya Vinoba Bhave) यांनी भारतीय इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची गणना देशातील महान स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवकांमध्ये केली जाते. भारताचे स्वातंत्र्यसेनानी, समाजसेवक, थोर विचारवंत आणि गांधीवादी नेते आचार्य विनोबा भावे यांची आज जयंती आहे. आचार्य विनोबा भावे यांची भारतातील भूदान आणि सर्वोदय चळवळीचे नेते म्हणून ख्याती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे.
आचार्य विनोबा भावे यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 साली कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी एका ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव विनायक नरहरी भावे. त्यांच्या वडिलांचे नाव नरहरी शंभूराव आणि आईचे नाव रूक्मिणी देवी असे होते. आचार्य विनोबा भावे यांचा बहुतांश काळ धार्मिक कार्यात आणि अध्यात्मात गेला. लहानपणी ते आईकडून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि भगवद्गीतेच्या कथा ऐकत असत. याचा त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला.
विनोबा भावे यांनी रामायण, कुराण, बायबल, गीता अशा अनेक धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांचे संपूर्ण आयुष्य ऋषी आणि तपस्वी म्हणून व्यतीत झाले.
1916 मध्ये वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि भिक्षू बनण्यासाठी ते काशी शहरात पोहोचले. तेथे त्यांनी महान पंडितांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रांचा सखोल अभ्यास केला.
गरिबी संपविण्याचा प्रयत्न :
आचार्य विनोबा भावे यांनी गरिबी संपविण्याचे काम सुरु केले. 1950 मध्ये त्यांनी सर्वोदय चळवळ सुरु केली. गांधीजींनी 1940 साली ब्रिटीश सरकारच्या युद्ध धोरणांच्या विरोधात राष्ट्रीय आंदोलन, निदर्शनाचे नेतृत्व करण्यासाठी विनोबा भावे यांची निवड केली होती. 30 जानेवारी 1948 रोजी गांधींच्या हत्येनंतर त्यांचे अनुयायी विनोबा भावे यांच्याकडे दिशा शोधत होते. या चळवळीला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आणि जनजागृतीबरोबरच सामाजिक निर्णयांमध्ये लोकसहभाग वाढला. भारतीय समाजाच्या संपूर्ण परिवर्तनासाठी 'अहिंसक क्रांती' करण्याची गरज आहे, असे विनोबा भावे यांचे मत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भूदान चळवळीचे नेते विनोबा भावे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. भावे यांचे जीवन गांधीवादी तत्त्वांची अभिव्यक्ती होती, असे मोदींनी ट्विट केले.
1895 मध्ये जन्मलेल्या विनोबा भावे यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान म्हणाले, "त्यांचे जीवन गांधीवादी तत्त्वांची अभिव्यक्ती आहे. त्यांना सामाजिक सक्षमीकरणाची आवड होती आणि त्यांनी 'जय जगत'चा नारा दिला. आम्ही त्यांच्या आदर्शांनी प्रेरित आहोत आणि आमच्या देशासाठी त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत."