India Corona Update : देशातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस घटताना दिसत आहे. देशात कोरोना रुग्णांसह कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्येही घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 5 हजार 76 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यासह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 47 हजार 945 इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात देशात 11 कोरोनाबाधितांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोना रुग्णांसह सक्रिय रुग्ण आणि मृत्य झालेल्या रुग्णांचे प्रमाणही घटले आहे. देशात शुक्रवारी 5554 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात 5076 नवीन रुग्णांची नोंद आणि 11 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांमध्ये 478 रुग्णांची घट झाली असून बळींची संख्याही सात अंकांनी कमी झाली आहे.
सक्रिय रुग्णांसह मृत्यूही घटले
देशातील कोरोनाचा आलेख घसरताना दिसत आहे. सक्रिय रुग्णांसह मृत्यूचं प्रमाणही घटलं आहे. गेल्या 24 तासांत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत 5 लाख 28 हजार 150 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.11 टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.71 टक्के आहे.
मुंबईत सर्वाधिक 1,900 सक्रिय रुग्ण
मुंबईत शनिवारी 251 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या 24 तासांत 209 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,47,791 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.1 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,717 झाली आहे. सध्या मुंबईत 1,900 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 209 रुग्णांमध्ये 188 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 2733 दिवसांवर गेला आहे.
महाराष्ट्रातील रुग्णसंख्या घटतेय
शनिवारी महाराष्ट्रात 734 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. गुरूवार आणि शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी नोंद झालेली रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. कारण गुरुवारी राज्यात 1076 कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली होती. त्यात घट होऊन शुक्रवारी 955 रूग्णांची नोंद झाली होती. तर यात घट होऊन आज 734 नव्या रूग्णांची नोंद झालीय. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 1,216 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 79,55,268 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98. 9 टक्के झाले आहे.