Vinayak Raut Letter : विधीमंडळातील कार्यालयापाठोपाठ संसदेतील कार्यालय शिवसेनेने (शिंदे गट) ताब्यात घेतलं. शिवसेनेचे (Shiv Sena) गटनेते खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी संसदेतील काल (1 मार्च) संसदेतील कार्यालय ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांनी कार्यालयातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे फोटो काढले होते. या प्रकरणी आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना पत्र लिहिलं आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो शिवसेना संसदीय पक्षाच्या कार्यालयातून चोरीला गेला, असा दावा त्यात करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो फेब्रुवारी 2023 मध्ये चोरीला गेल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. याकडे लक्ष द्यावं आणि फोटो पुनर्प्राप्त करुन कार्यालयात त्याच ठिकाणी ठेवा, अशी विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेलं पत्र
विषय :- आमच्या (शिवसेना) संसदीय पक्ष कार्यालयातून आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे आणि युवासेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे यांच्या फोटोच्या चोरीच्या संदर्भात.
सर,
शिवसेना संसदीय पक्षाचे कार्यालय 128, 3रा मजला, संसद भवन, नवी दिल्ली येथे आहे हे तुम्हाला माहिती आहेच. लोकसभा सचिवालयाने हे कार्यालय शिवसेना संसदीय पक्षाला लोकसभा आणि राज्यसभेत काम करण्यासाठी कार्यालय म्हणून दिले आहे.
महोदय, मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आमच्या संसदीय पक्ष कार्यालयात (128, संसद भवन), शिवसेना संस्थापक आणि प्रमुख हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे आणि युवासेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे जी यांना प्रदर्शित केले होते. ज्यामध्ये पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे आणि युवा ठाकरे यांचे फोटो फेब्रुवारी 2023 मध्ये चोरीला गेले आहेत. त्यामुळे आपणास विनंती आहे की, त्याकडे लक्ष द्यावे, आणि फोटो पुनर्प्राप्त करून कार्यालयात त्याच ठिकाणी ठेवा.
धन्यवाद
विनायक राऊत
कार्यालयात आता बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांचा फोटो
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर मुंबईतील विधीमंडळ पक्ष कार्यालय ठाकरे गटाने गमावलं होतं. त्यानंतर काल दिल्लीतील शिवसेना संसदीय पक्षाचे कार्यालयही त्यांना गमवावं लागलं. दिल्लीतील शिवसेनेचं कार्यालय एकनाथ शिंदे यांना दिल्याचं पत्र खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाने लोकसभा सचिवालयाने पाठवलं होतं. यानंतर संसदेच्या शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आले. त्याजागी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले आहेत.