HIV Infection: अनेक जण आजकाल टॅटू गोंदवतात. टॅटू गोंदवण्याची क्रेज आपल्याला वाढताना बघायला मिळत आहे. मात्र, उत्तर प्रदेशात टॅटू गोंदवणे काही जणांना चांगलेच महाग पडले आहे. इतकं की थेट ते मृत्यूच्या दाढेत ढकलले गेले आहेत. काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूयात. अनेक लोक टॅटू गोंदवून घेण्याआधी अनेक गोष्टींचा विचार करतात. तो कोणत्या डिझाइनचा असावा, कसा असावा, कोणासाठी असावा? दुसरीकडे, गोंदवून घेताना तो सुरक्षित आहे की नाही? दुखणार तर नाही? असे एका ना असंख्य प्रश्न टॅटूगोंदवणाऱ्याच्या मनात असतात. पण, टॅटू काढणाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे काही जणांचे आयुष्य उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे. टॅटू काढण्यासाठी एकाच सुईचा वापर केल्यानं उत्तर प्रदेशातील वाराणसीत काही जणांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशात 14 जणांना टॅटू गोंदवल्यानंतर अचानक ताप आला. त्यानंतर त्यांची टायफाइड आणि मलेरियासंदर्भातली तपासणी करण्यात आली. मात्र, यात काहीच निष्पन्न झालं नाही. ताप कमी होत नसल्यानं एचआयव्हीची चाचणी करण्यात आली. आणि त्यातून सर्वांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. ह्या चौदाही जणांची विचारपूस करण्यात आल्यानंतर त्यांनी अलीकडेच शरीरावर टॅटू काढल्याचे सांगितलं. तेव्हा कळलं की टॅटू काढण्याची सुई ही महाग असते आणि अशातच टॅटू काढणाऱ्याने पैसे वाचवण्यासाठी एकाच सुईचा वापर केल्याने ह्या सर्वांचा जीव टांगणीला लागलाय.
सुईचा वापर करण्यात आल्यानं एचआयव्हीची लागण झाल्याने आयुष्यातील पुढील धोके देखील ह्या लोकांचे वाढले आहेत. अशात, पुढे जात ह्या सर्वांना एड्सचा देखील धोका आहे. त्यामुळे घडलेला हा सर्व प्रकार धक्कादायक असल्याचे सांगितले जाते आहे. एक सुई जीव वाचवू शकते तर तीच सुई जीव घेऊ देखील शकते. अशात टॅटू बनवणाऱ्यांनी देखील फक्त अधिकचे पैसे मिळवण्यासाठी असे प्रकार न करता यासंदर्भात अधिकची काळजी घेतली तर असे धोके टळतील.