वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने पेन्शनसाठी चार महिन्यांपूर्वी निधन झालेल्या 70 वर्षीय आईवर अंत्यसंस्कार केले नाहीत. मुलांनी महिलेच्या मृतदेहावर केमिकल लावून ते सुरक्षित ठेवलं होतं, जेणेकरुन शरीर खराब होणार नाही आणि दुर्गंध पसरणार नाही.


पोलिसांनी घरावर छापा मारुन ही घटना उघडकीस आणली. वाराणसीजवळच्या भेलुपूर इथल्या कबीरनगरमध्ये ही घटना घडली आहे. अमरावती नावाच्या या महिलेचं 13 जानेवारी 2018 रोजी निधन झालं होतं.

40 हजार रुपये पेन्शन
अमरावतींचे पती दया प्रसाद यांचं निधन 2000 मध्ये झालं होतं. त्यानंतर अमरावतींना महिन्याला 40 हजार रुपये पेन्शन मिळत होती. या पेन्शनच्या लालसेपोटी महिलेच्या मुलांनी तिच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कार न करता, केमिकलच्या मदतीने मृतदेह सुरक्षित ठेवला आणि दर महिन्याला पेन्शन घेत होते.

असा झाला उलगडा!
बरेच दिवस महिला न दिसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. शिवाय आरोपी कुटुंब कोणालाही आपल्या घरी येऊ देत नव्हतं. त्यामुळे कोणीतरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी कुटुंबाच्या घरावर छापा मारला आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. सोबतच पोलिसांनी घरही सील करुन मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला.

महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला त्यावेळी हाताच्या अंगठ्यावर शाईचे डाग होते. यावरुन हे कुटुंब महिलेच्या मृतदेहाचा अंगठा लावून पेन्शन घेत होतं, हे स्पष्ट होतं.

बेरोजगार मुलं आईच्या पेन्शनवर अवलंबून
मृत महिलेच्या कुटुंबात पाच मुलं आणि तीन मुली आहे. त्यापैकी दोन मुलांची आणि मुलींची लग्न झाली आहेत. पाचही मुलं बेरोजगार असून महिलेला मिळत असलेल्या पेन्शनवर जगत होते. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.