Vaccine For Children:  संपूर्ण देशभरात कोरोनाविरोधातील (Corona in India) लढाई नेटानं लढली जात आहे. देशात कोरोनावरील (Corona vaccination) लसीकरण वेगानं होऊ लागलं आहे. आतापर्यंत 18 वर्षांवरील लोकांना लसीकरण केलं जात आहे. आता देशातील लहान मुलांना देखील लसीकरण केलं जाणार आहे. यासाठीची तयारी सुरु झाली आहे. आता लहान मुलांना कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी कोविड लसीकरणाची ट्रायल सुरु आहे. त्यामुळं लवकरच लहान मुलांसाठी लस येण्याची आशा निर्माण झाली आहे.  आधी 12 वर्षांवरील मुलांवर ट्रायल सुरु केल्यानंतर आता 7 ते 11 वयोगटातील मुलांवर लसीकरणाच्या ट्रायलला सीरम इंन्स्टिट्यूटला परवानगी मिळाली आहे. 


Novavax Vaccine : सीरम इन्स्टिट्युट नोव्हावॅक्स लसीची जुलैमध्ये मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु करण्याची शक्यता


भारताममध्ये अनेक राज्यांमधील शाळा हळूहळू सुरु होऊ लागल्या आहेत. लहान मुलांना कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या लसीवर काम करत आहेत.  सीरम इंस्टिट्यूट 7 ते 11 वयोगटातील मुलांसाठी अमेरिकेची कंपनी नोवावॅक्सच्या लसीवर संशोधन करत आहे. कंपनीनं भारतात या लसीचं नाव कोवावॅक्स ठेवलं आहे.  भारतीय औषध नियामक मंडळाने (DCGI) सीरम इंस्टीट्यूटला 7 ते 11 वयोगटातील मुलांवर नोवावॅक्सच्या लसीच्या ट्रायलसाठी परवानगी दिली आहे.  


12-17 वयोगटातील मुलांवर ट्रायलसाठी आधीच परवानगी
भारतीय औषध नियामक मंडळाने (DCGI) सीरम इंस्टीट्यूटला 12-17 वयोगटातील मुलांवर नोवावॅक्सच्या लसीच्या ट्रायलसाठी आधीच परवानगी दिली आहे.   कंपनीने ही ट्रायल देशभरातील 100 मुलांवर केली आहे.  मात्र या लसीच्या आपत्कालीन वापराला देशात अद्याप तरी मंजूरी मिळालेली नाही. देशात केवळ झायडस कॅडिलाच्या लसीलाच 12 वर्षांहून अधिक वय असलेल्या मुलांना आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळालेली आहे.  


नोव्हावॅक्सचा चाचणी डेटा आशादायक
कोविड 19 विरूद्ध नोव्हावॅक्स लसीच्या परिणामकारकतेची आकडेवारी आशादायक आहे. नीती आयोगाचे सदस्य ( आरोग्य ) व्ही के पॉल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते की, सार्वजनिकपणे उपलब्ध आकडेवारुन असं लक्षात येतं की नोव्हावॅक्स ही लस सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी आहे. उपलब्ध आकडेवारीवरून आपण जे पाहात आहोत ते म्हणजे ही लस खूपच सुरक्षित आणि प्रभावी आहे. परंतु ही लस भारतात सीरम इन्स्टिट्यूट तयार करेल, हे त्याहून प्रभावी आहे. सीरम इन्स्टिट्यूटने  लस निर्मितीची कामे यापूर्वीच पूर्ण केली आहेत आणि प्रणाली पूर्णत: कार्यान्वित करण्यासाठी चाचण्या घेत आहे, जे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, असं व्ही के पॉल यांनी सांगितलं होतं.