Uttarkashi Tunnel Rescue Operation : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशीतील (Uttarkashi) सिल्क्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) 41 कामगारांचा जीव वाचवण्यासाठीचे प्रयत्न कायम आहेत. मागील 15 दिवसांहून अधिक काळ हे 41 मजूर बोगद्यामध्ये दगड आणि मातीच्या ढिगाऱ्यामध्ये अडकले आहे. बचावाकार्यात अनेक प्रकारचे अडथळे येत आहेत. सुटकेसाठी खणलेल्या बोगद्यांच्या मार्गात अडथळे येत आहेत. शोध आणि बचावकार्यासाठी देशाच्या विविध भागांतून आणल्या जाणाऱ्या मशिन्सना सिल्क्यारा येथे नेण्यासाठीही  खराब रस्त्यांमुळे अडचणी येत आहेत. अजूनही बचावकार्य सुरू आहे, कामगार लवकरच बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे.


बचावकार्याचा 16 वा दिवस


उत्तरकाशी टनेल रेस्क्यू ऑपरेशन मागील पंधरा दिवसांपासून सुरु आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी माती कोसळून 41 मजूर बोगद्यामध्ये अडकले. 12 नोव्हेंबरपासून हे बचावकार्य सुरु आहे. मात्र, अद्याप मजुरांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. आज या बचावकार्याचा 16 वा दिवस आहे. उत्तरकाशी येथील चारधाम ऑल वेदर प्रोजेक्टच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांची जीव वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचे काम सुरू असले तरी ड्रिलिंगच्या कामात सतत येणाऱ्या अडथळ्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात अडचण येत आहे. मात्र, कामगारांची प्रकृती चांगली असून त्यांना पाईपद्वारे ऑक्सिजन आणि अन्नपुरवठा केला जात आहे.


मजुरांच्या बचावकार्यात लष्कराची मदत


या बचावकार्यात भारतीय सैन्य दलही वेगाने काम करत आहे. भारतीय लष्कराच्या अभियांत्रिकी रेजिमेंटमधील सैनिक आणि अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानात नैपुण्य आहे. हे सर्वजण मॅन्युअल ड्रिलिंगच्या कामात मदत करत आहेत. याद्वारे बोगद्याच्या आत अडकलेल्या कामगारांसाठी 800 मिमी पाईपसह एस्केप पॅसेज तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.


बोगद्याच्या दोन किलोमीटर लांबीच्या भागात कामगार 


ग्रामस्थ राम कुमार बेदिया यांनी सांगितले की, 1 नोव्हेंबर रोजी गावातील 13 लोक उत्तरकाशी बोगदा प्रकल्पात कामासाठी गेले होते. ते म्हणाले, “दुर्घटना घडली तेव्हा त्यातील तिघे बोगद्याच्या आत काम करत होते.” बोगद्याच्या आतील ढिगाऱ्यात अडकलेल्या ऑगर मशीनचे भाग कापण्यासाठी आणि काढण्यासाठी रविवारी हैदराबादहून प्लाझ्मा कटर आणण्यात आला. पुढील बचावकार्यासाठी, मशीन पूर्णपणे काढून टाकणे आवश्यक आहे. कामगारांना बाहेर पडण्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी हाताने ड्रिलिंग करून पाईप टाकावे लागणार आहेत. कामगार बोगद्याच्या दोन किलोमीटर लांबीच्या भागात आहेत. त्यांच्यापर्यंत सहा इंच रुंद पाईपद्वारे अन्न, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवल्या जात आहेत.