Uttarakhand goa results 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार आहे. पंजाबमध्ये मात्र, आम आदमी पार्टीने करिष्मा केला आहे. दरम्यान, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये भाजपने यश संपादन करुनही मुख्यमंत्री पदासाठी पेच निर्माण झाला आहे. कारण, उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळूनही मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पराभवचा धक्का बसला आहे. त्यानंतर अनेक इच्छुकांची नावे मुख्यमंत्री पदासाठी समोर आली आहेत. तसेच दुसरीकडे गोव्यात देखील मुख्यमंत्री पदावरुन पेच होण्याची शक्यता आहे. 


उत्तराखंडमध्ये भाजपला जनादेश मिळाला असला तरी तिथे गड आला पण सिंह गेला अशीच स्थिती झाली आहे. कारण, मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे अशा स्थितीत भाजप त्यांना पुन्हा संधी देणार की मुख्यमंत्र्यांच्या रुपाने नवा चेहरा समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर होळीनंतर लगेच मिळू शकेल. भाजपचे उत्तराखंड निरीक्षक 19 मार्चला डेहराडूनला भेट देणार आहेत. याठिकाणी होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.


उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत या नावांची चर्चा 


पुष्कर सिंह धामी
आरोग्य मंत्री धनसिंग रावत
सतपाल महाराज
भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक
माजी मुख्यमंत्री भवन खंडुरी यांच्या कन्या रितू खंडुरी
मसुरीचे आमदार गणेश जोशी


या नावांची सध्या मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री पदाचे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांच्याशिवाय केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि राज्यसभेचे खासदार अनिल बलुनी हेही शर्यतीत आहेत. मात्र, अद्याप एकाही नेत्याने आपल्या नावाला दुजोरा दिला नसून, केंद्रीय नेतृत्व आणि विधिमंडळ दल याबाबत निर्णय घेतील, असे सर्वांचे म्हणणे आहे.


गोव्यातही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरुन पेच 


गोव्यातही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर पेच होण्याची शक्यता आहे. गोव्यात भाजपने 40 पैकी 20 जागा जिंकल्या आहेत. चांगल्या जागा मिळूनही मुख्यमंत्रीपदाच्या दावेदाराचा चेहरा स्पष्ट झालेला नाही. एवढेच नाही तर पक्षातील अंतर्गत कलह असल्याचीही चर्चा आहे. गोव्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि विश्वजित राणे या दोन बड्या नेत्यांमध्ये खडाजंगी सुरु झाली आहे. विश्वजित राणे यांनी प्रमोद सावंत यांना नेता मानण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तिथे पेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
दरम्यान, विश्वजित राणे यांनी एका मराठी वृत्तपत्रात एक जाहीरात दिली होती. यामध्ये प्रमोद सावंत यांचा चेहरा दिसत नव्हता. यापूर्वी त्यांच्या आमदार पत्नी दिव्या राणे यांनीही असेच पोस्टर छापले होते, ज्यामध्ये प्रमोद सावंत यांचा फोटो नव्हता. दरम्यान, मुख्यमंत्री पदाच्या मुद्यवरुन गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची झोप उडवली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: