Uttarakhand: उत्तराखंडमधील जोशीमठ जवळ हिमकडा कोसळल्याने मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 36 लोकांचे शव हाती लागले असून अजून 170 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. तपोवन बोगद्यात 35 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून त्यांच्या बचावासाठी आता एक ऑपरेशन सुरुवात करण्यात आलं आहे.
तपोवनातील हा बोगदा आतापर्यंत 130 मीटरपर्यंत साफ करण्यात आला आहे. जवळपास 180 मीटर अंतरानंतर या बोगद्याला एक वळण आहे. या ठिकाणी लोक अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. कारण या ठिकाणी वळण असल्याने पुढे चिखल गेला नसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तपोवणातील हा बोगदा जवळपास साडे तीन किलोमीटर अंतराचा आहे. या बोगद्यात अडकलेल्या 35 लोकांच्या बचावासाठी रात्र दिवस ऑपरेशन सुरु आहे.
उत्तराखंडच्या या आपत्तीत सर्वात जास्त नुकसान हे एनटीपीसीच्या पॉवर प्रोजेक्टचे झाले आहे. जवळपास 1500 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या पॉवर प्रोजक्टमुळे या ठिकाणी टनेलचे काम जोरात सुरु होतं. हिमकडा कोसळल्यानंतर 350 किमी प्रति तास या वेगाने पाणी या ठिकाणी पोहचले. त्यामुळे पाण्यासोबत वाहून आलेल्या चिखलाने हा बोगदा बंद झाला आहे.
या प्रोजेक्टवर काम करणारे कर्मचारी या ठिकाणी अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ, लष्कर आणि एसडीआरएफ ने एक संयुक्त मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम रात्रभर सुरु आहे.
उत्तराखंडच्या या आपत्तीमध्ये केंद्र सरकार लागेल ती मदत राज्याला देणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलंय. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी जोशीमठला भेट दिली.