नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी ट्वीटद्वारे त्याबद्दल माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले की, "जो बायडन यांच्याशी माझं आज बोलणं झालं. त्यांच्या यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. आम्ही प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. हवामान बदलांवर सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही सहमती दर्शविली आहे."


पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष आणि मी इंडो-पॅसिफिक प्रदेशात आणि त्यापलीकडे शांतता, सुरक्षा या दृष्टीने रणनिती करत भागीदारी बळकट करण्यास उत्सुक आहोत. जो बायडन यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो बायडन यांच्याशी पहिले संभाषण केले आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून जो बायडन यांचं शपथ घेतल्यानंतर अभिनंदन केलं होतं.

पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, भारत-अमेरिका संबंधांना नवीन उंचीवर नेण्यासाठी अध्यक्ष जो बायडन यांच्याबरोबर काम करण्यास मी वचनबद्ध आहे. सामान्य आव्हानांना तोंड देण्यासाठी आम्ही एकत्र उभे आहोत. भारत-अमेरिका संबंध सामायिक मूल्यांवर आधारित आहेत. दोन्ही देशांमध्ये बहुपक्षीय द्विपक्षीय अजेंडा, वाढते आर्थिक संबंध आणि लोकांमधील मैत्रीपूर्ण संबंध आहेत.