देहरादून : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंडमधून एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. इथल्या एका वृद्ध महिलेने आपली सर्व संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधल्या नेहरु कॉलनी डालनवालामध्ये राहणाऱ्या पुष्पा मुंजियाल यांनी आपला वारस म्हणून राहुल गांधी यांची घोषणा करत संपूर्ण संपत्ती राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. या संपत्तीमध्ये 50 लाख रुपयांची एफडी आणि 10 तोळं सोन्याचा समावेश आहे.
याआधी दून रुग्णालयालाही मदत
अशाप्रकारे दान करण्याची पुष्पा मुंजियाल यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2011 मध्ये त्यांनी दून या सरकारी रुग्णालयाला 25 लाख रुपयांचं दान दिलं होतं. हे पैसे गरिबांच्या इलाज, औषधांसह रुग्णालयातील मशिनच्या देखरेखीसाठी खर्च करण्यासाठी दिले होते.
'संपत्तीचा मालकी हक्क राहुल गांधी यांना सोपवावा'
पुष्पा मुंजियाल यांनी आपली संपत्ती राहुल गांधी यांच्या नावावर करत ते मृत्युपत्र देहरादून कोर्टातही सादर केलं आहे. त्यांनी कोर्टात आपल्या संपत्तीचं विवरण देताना म्हटलं की, माझ्यानंतर माझ्या संपूर्ण मालमत्तेची मालकी राहुल गांधी यांच्याकडे सोपवावी. 79 वर्षीय पुष्पा मुंजियाल यांच्या मालमत्तेत 50 लाखांची एफडी आणि 10 तोळे सोन्याचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या विचारांनी प्रभावित होत पुष्पा यांनी त्यांना या संपत्तीचा वारस बनवलं आहे.
राहुल गांधी यांच्या विचारांचा प्रभाव
संपत्ती दान करणाऱ्या महिलेचं नाव पुष्पा मुन्जियाल आहे, त्यांचं वय 79 वर्षे आहे. माझ्यावर राहुल गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत गांधी कुटुंबाने नेहमीच देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. मग ते इंदिरा गांधी असोत की राजीव गांधी. या देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.
दुर्घटनेत पुष्पा मुंजियाल यांनी दृष्टी गमावली
पुष्पा मुंजियाल या अंध आहेत, पण त्यांचे विचार थोर आहेत. पुष्पा प्रेम धाम नावाच्या वृद्धाश्रमात त्या राहतात. आपल्याला दिसू शकत नाही म्हणून त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबावर आणि नातेवाईकांवर ओझं बनायचं नव्हतं. त्यामुळे त्या वृद्धाश्रमात राहतात. पुष्पा मुंजियाल या शाळेत शिक्षिका होत्या. आपल्या निवृत्तीच्या दोन वर्ष आधी त्यांनी व्हीआरएस घेतली होती. पण 1998 मध्ये एका दुर्घटनेत त्यांची दृष्टी गेली. त्यानंतर त्या काही काळ आपल्या बहिणींसोबत राहत होत्या. परंतु आपण आपल्या नातेवाईकांवर ओझं बनत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. यामुळे त्यांनी देहरादूनच्या डालनवालामधील प्रेम धाम वृद्धश्रमात राहण्याचा निर्णय घेतला.