डेहराडून : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी पुष्कर सिंह धामी यांची वर्णी लागली होती. आता पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी रविवारी त्यांना राजभवनावर मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पुष्कर सिंह धामी यांच्या सोबत 11 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 


भाजपचे ज्येष्ठ नेते सतपाल महाराज, हरक सिंह रावत, बंशीधर भगत, यशपाल आर्य, बिशन सिंह चुफाल, सुबोध उनियाल, अरविंद पांडेय, गणेश जोशी, धन सिंह रावत, रेखा आर्य आणि यतीश्वरानंद या नेत्यांनी उत्तराखंडचे मंत्री म्हणून शपथ घेतली. 


पुष्कर सिंह धामी यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागल्यानंतर उत्तराखंड भाजपमधील अनेक नेते नाराज असल्याचं सांगण्याच येतंय. सध्या तरी या नेत्यांची नाराजी दूर करुन त्यांनी मंत्रिपद स्वीकारण्यासाठी पुष्करसिंह धामी यांनी आपले कौशल्य पणाला लावल्याचं दिसून आलं आहे. 


पुष्कर सिंह धामी हे आरएसएस पार्श्वभूमीचे नेते आहेत. राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी एबीव्हीपीमध्ये बरीच महत्त्वाची पदे भूषवली आहेत. धामी हे दोनदा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. उधमसिंह नगरच्या खतिमा विधानसभा मतदार संघातून धामी यावेळी दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत.


पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा स्वत: माजी मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी केली होती. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुष्करसिंह धामी म्हणाले, "माझ्या पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला सेवा करण्याची संधी दिली आहे. सर्वांच्या सहकार्याने राज्यासमोरील महत्वाच्या प्रश्नांवर कार्य करु आणि राज्यातील सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करु." 


महत्वाच्या बातम्या :