Uttarakhand Avalanche : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi Avalanche) येथे झालेल्या हिमस्खलनामुळे (Avalanche) 10 गिर्यारोहकांना जीव गमवावा लागला आहे. तसंच 14 गिर्यारोहकांना वाचवण्यात यश आलं असून आता मात्र ढगांमुळे हेलिकॉप्टर उडवण्यास अडचण येत असल्याने बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. सकाळी पुन्हा बचावकार्य सुरु होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील द्रौपदी दंड-2 शिखरावर तब्बल 17000 हजार फुट उंचीवर हिमस्खलन झाल्यानंतर जवळपास 28 गिर्यारोहक अडकले होते. ज्यानंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरु होतं. ज्याबद्दल बोलताना भटवारीचे उपविभागीय दंडाधिकारी छतर सिंग चौहान यांनी सांगितले की, बचावकार्यात वाचवण्यात आलेल्या 14 गिर्यारोहकांपैकी सहा जणांना हिमस्खलनात किरकोळ दुखापत झाली असून त्यांना हेलिकॉप्टरच्या दोन फेऱ्यानंतर वाचवण्यात आलं. या वाचवण्यात आलेल्या 14 जणांपैकी 10 प्रशिक्षणार्थी आणि चार प्रशिक्षक आहेत. पोलिसांनी जाहीर केलेल्या यादीनुसार हे प्रशिक्षणार्थी पश्चिम बंगाल, दिल्ली, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, आसाम, हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील आहेत.
उर्वरीत गिर्यारोहकांचा शोध सुरु
नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (SDRF), इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) आणि NIM संयुक्तपणे शोध आणि बचाव कार्य करत होते. मंगळवारी (4 ऑक्टोबर) सकाळी 9.45 वाजता हिमस्खलन झाल्यापासून बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध अजूनही सुरू आहे. बेपत्ता लोक डोकरीयानी बामक हिमनदीच्या हिमखंडात अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. संबधित ठिकाण मूळचं उत्तरकाशी जिल्ह्यातील लोंथरू गाव येथील आहे. बुधवारी सकाळी शोध आणि बचाव मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर आणि चार ITBP जवान चिता आणि ALH हेलिकॉप्टरमधून डोकारियानी ग्लेशियरवर गेले. पण मंगळवारी अंधारामुळे बचावकार्य विस्कळीत झाले. आता सकाळी बचावकार्य पुन्हा सुरु होईल अशी माहिती समोर आली आहे.
गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून शोक व्यक्त
अडकलेल्या गिर्यारोहकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. काही गिर्यारोहकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यानंतरही हिमस्खलनात काही गिर्यारोहक अडकल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हिमस्खलनात अडकलेल्या 10 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. उत्तरकाशीमध्ये हिमस्खलनाची घटना अत्यंत दुःखद आहे. यासंदर्भात मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. स्थानिक प्रशासन, SDRF, NDRF, ITBP आणि लष्कराचे पथक पूर्ण तयारीनिशी मदत आणि बचाव कार्यात गुंतले असल्याचे शाह म्हणाले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलून बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कराची मदत मागितली आहे.
हे देखील वाचा-