Republic Day 2022 : देशभरात आज 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. यावेळी राजपथावर 12 राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन चित्ररथांच्या माध्यमातून घडलं. यामध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथातून काशी विश्वनाथ धामची झलक दाखवण्यात आली आहे. यामध्ये प्राचीन शहरांचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती प्रदर्शित करण्यात आली.
यंदा राजपथावर 12 राज्यांच्या चित्ररथांचे दर्शन झालं. यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, छत्तीसगढ, मेघालय, गुजरात, गोवा, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटक, हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या चित्ररथांचा समावेश आहे.
दरम्यान, आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या चित्ररथांची निवड करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण 12 राज्यांच्या चित्ररथांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड या राज्यांच्या चित्ररथांचा समावेश आहे. तर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडलेल्या पोशाखामध्येही उत्तराखंडची पारंपारिक टोपी आणि मणिपूरमध्ये वापरत असलेला स्टोल (उपरणं) घातला आहे. याशिवाय उत्तराखंडचे राज्य फूल असलेल्या ब्रम्हकमळाच्या आकाराचा मास्क नरेंद्र मोदी यांनी घातला आहे.
उत्तर प्रदेशच्या चित्ररथातून काशी विश्वनाथ धामची झलक
राजपथावरील उत्तर प्रदेशच्या चित्ररथातून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याची उत्पादने दाखवण्यात आली आहेत. त्यामध्ये पारंपारिक कलाकुसर, विणकर आणि हस्तकलेच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेचा वेगही दिसून येतो. काशी विश्वनाथ धामचा गौरवशाली इतिहास चित्ररथाच्या मागील भागात प्रदर्शित करण्यात आला आहे. वाराणसी शहर वरुणा आणि अस्सी या दोन नद्यांनी बनले आहे. मोक्षदायिनी गंगेच्या पश्चिम तीरावर वसलेल्या या शहराच्या मध्यभागी वसलेल्या काशी विश्वनाथ धाममध्ये भगवान विश्वेश्वराचे ज्योतिर्लिंग पूजनीय आहे.
उत्तर प्रदेशमधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग धोरण आणि औद्योगिक विकास धोरणावर आधारित ODOP कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकास आणि रोजगाराची उपलब्धी उत्तर प्रदेशच्या चित्ररथातून दाखवण्यात आली आहे. याबरोबरच गोरखपूरची प्रसिद्ध टेराकोटा सिरेमिक हस्तकलाही या रथातून प्रदर्शित केली आहे. पितळेळ्या धातूपासून बनवण्यात आलेल्या गायीने हस्तकलेचे प्रतिनिधित्व केले. चित्ररथाचा मधला भाग वाराणसीच्या घाटांवर हिंदू संतांनी सूर्याला अर्घ्य देण्याची आणि सकाळची प्रार्थना करण्याची संस्कृती दर्शवतो.
महत्वाच्या बातम्या
- Republic Day 2022 Google Doodle भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास डुडल; भारतीयांना दिल्या शुभेच्छा
- Republic Day 2022 : 73 वा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! कार्यक्रमाची रुपरेषा जाणून घ्या...
- President Kovind Speech: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती कोविंद यांनी केलं देशाला संबोधित
- Padma Awards : 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर; जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण