Uttar Pradesh election 2022 : देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा रणसंग्राम सुरू आहे. या रणसंग्रामातील मतदानाचा पहिला टप्पा आज पार पडला आहे. उत्तर प्रदेशमधील 58 विधानसभेच्या जागांसाठी 58 टक्के मतदान झाले आहे. 11 जिलह्यातील 58 मतदार संघामधील 623 जणांचं भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली होती, सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरु होतं. मतदानावेळी नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
पहिल्या टप्प्यात शामली, हापुड, गौतमबुद्ध नगर, मुजफ्फरनगर, मेरठ, बागपत, गाजियाबाद, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा या जिल्ह्यामध्ये मतदान झाले. येथील 58 विधानसभा मतदार संघात 623 उमेदवारांनी आपले नशीब अजमावले आहे. यामध्ये 73 महिला उमेदवारांचा समावेश आहे. या सर्वांचे राजकीय भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. दहा मार्च 2022 रोजी कोण जिंकले, कुणाचा पराभव झाला, याचा निकाल लागणार आहे.
58 टक्के मतदान –
सायंकाळी सहा वाजेपर्यंत 58 विधानसभा मतदार संघामद्ये 58.25 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान कैराना विधानसभामध्ये झाले आहे. कैरानामध्ये 65.3 टक्के मतदान झाले. सर्वाधिक कमी साहिबाबाद या मतदार संघात मतदान झाले आहे. साहिबाबादमध्ये 38 टक्के मतदान झालेय.
कोणत्या जिल्ह्यात किती मतदान?
आग्रा - 58.02 टक्के
अलीगढ -57.25 टक्के
बागपत-61.25 टक्के
बुलंदशहर-60.57 टक्के
गौतमबुद्धनगर-53.48 टक्के
गाजियाबाद-52.43 टक्के
हापुड-60.53 टक्के
मथुरा-59.34 टक्के
मेरठ-58.97 टक्के
मुजफ्फरनगर-62.09 टक्के
शामली-66.14 टक्के
105 वर्षाच्या आजीने केलं मतदान -
मतदानासाठी तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत उत्साह दिसत होता. मुजफ्फरनगरमध्ये एका मतदान केंद्रावर 105 वर्षाच्या आजींनी मतदान केलं. यावेळी त्या म्हणाल्या की, ‘सुरक्षा आणि विकासासाठी मी मतदान केलं आहे.’
2017 मध्ये भाजपने 58 पैकी 53 जागा जिंकून मोठी आघाडी घेतली होती -
उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांसाठी मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया 7 टप्प्यात पार पडणार आहे. याातील पहिला टप्पा आज पार पडला आहे. आज 58 जागांसाठी मतदान झाले. आज मतदान झालेल्या भागात शेतकरी व जाट यांचे प्राबल्य आहे, त्यामुळे यावेळी शेतकरी आंदोलनामुळे येथील समीकरण गेल्या निवडणुकीपेक्षा काहीसे वेगळे मानले जात आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर या भागातील भाजपने 58 पैकी 53 जागा जिंकून मोठी आघाडी घेतली होती. मात्र यावेळी ते तितकेसे सोपे मानले जात नाही.