लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. योगींनी सर्जिकल स्ट्राईकची तुलना शिवाजी महाराजांचं युद्धकौशल्य, गनिमीकाव्याशी केली. लखनऊमधील कुर्मी पटेल संमेलनात ते बोलत होते.
योगी म्हणाले, “औरंगजेबने उन्माद माजवला होता, त्यावेळी त्याला भारत मातेचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी नतमस्तक होण्यास भाग पाडलं होतं. औरंगजेबचा सेनापती अफजल हा अनेकवेळा शिवाजी महाराजांना भेटू इच्छित होता. मात्र त्याचा हेतू शिवाजी महाराजांनी ओळखला होता. तो शिवाजी महाराजांची हत्या करणार होता. मात्र महाराजांनी त्याचा हा डाव उलटवला होता. महाराजांप्रमाणेच मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. चीनही अनेकवेळा घुसखोरी करतंय. पण मोदी सरकारमध्ये त्यांना मागेच हटावं लागतं”
यावेळी योगींनी मोदींच्या राजकीय निर्णयांचं स्वागत केलं. “देशाचा संक्रमण काळ सुरु आहे.मोदींच्या नेतृत्त्वात देश आर्थिक महाशक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र त्याचवेळी समाजकंटकांकडून देशात जाती, भाषा, प्रांताच्या आधारे नक्षलवाद आणि माओवादाला चालना देण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशात राजकीय अस्थिरता निर्माण करणाऱ्यांना आपण 2019 ला पुन्हा उत्तर देऊ. आज जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची मान उंचावली”, असं योगी म्हणाले.
दरम्यान, योगींनी कुर्मी पटेल संमेलनात काँग्रेसवरही हल्लाबोल केला. काँग्रेसने सरदार पटेलांचा अपमान केला, तर भाजपने त्यांचा सन्मान केला असं योगी म्हणाले.