राहुल गांधींनी राजस्थानमध्ये काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. यावेळी राफेल डील, विजय मल्ल्या प्रकरण, नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींवर तिखट शब्दात टीका केली. राफेल डीलवरुन राहुल गांधी म्हणाले की, "मला देशाचा पंतप्रधान नाही तर चौकीदार बनायचं आहे, असं मोदी म्हणाले होते. पण आज देशाच्या मनात नवा आवाज घुमत आहे, गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है."
संरक्षण मंत्र्यांना न सांगताच अंबानींना कंत्राट
राफेल डीलचा उल्लेख करताना राहुल गांधी म्हणाले की, "मोदींनी संरक्षण मंत्र्यांना न विचारताच अनिल अंबानींच्या कंपनीला कंत्राट दिलं. यूपीए सरकारने 126 राफेल विमान खरेदी करण्याचा करार केला होता. त्यापैकी एका विमानाची किंमत 526 कोटी रुपये होती. 70 वर्षांपासून हे विमान बनवणाऱ्या एचएएल या सरकारी कंपनीना हे कंत्राट मिळणार होतं, परंतु पंतप्रधान मोदींनी सगळं बदललं."
"2014 मध्ये मोदी सरकार येतं, स्वत: पंतप्रधान मोदी फ्रान्सला जातात, त्यांच्यासोबत अनिल अंबानीही जातात. या दरम्यान एचएएल कंपनीकडून कंत्राट काढून अनिल अंबानींच्या कंपनीला दिलं जातं, ज्या कंपनीला विमान बनवण्याचा कोणताही अनुभव नाही. इतकंच नाही अंबानींच्या कंपनीवर 40,000 कोटी रुपयांचं कर्जदेखील आहे. धक्कादायक म्हणजे पंतप्रधान मोदी संरक्षण मंत्र्यांना न विचारताच अंबानींना कंत्राट दिलं," असं राहुल गांधींनी सांगितलं.
चौकीदाराच्या देखदेखील मल्ल्या फरार
"मी पंतप्रधान नाही तर देशाचा चौकीदार आहे," पंतप्रधान मोदींच्या या विधानाची आठवण करुन देताना राहुल गांधी म्हणाले की, "आता चौकीदारच्या देखरेखीत मल्या 9000 कोटी रुपयांची चोरी करुन फरार झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फरार होण्याआधी मल्ल्या देशाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेतो. मल्ल्यासोबत भेट झाल्याचं जेटलींनीही मान्य केलं. यामुळे अर्थमंत्र्यांनी चोराला पळून जाण्यात मदत केली हे स्पष्ट होतं. यामध्ये चौकीदारही सहभागी आहे. त्यामुळे मी बोलतो ती गली गली में शोर है, चौकीदार चोर है."
राहुल गांधींकडे ना आचार, ना विचार : वसुंधरा राजे
दुसरीकडे राहुल गांधींच्या या विधानावर भाजपने आक्षेप नोंदवला आहे. "राहुल गांधींनी ज्या शब्दांचा वापर केला, त्यावरुन स्पष्ट होतं की काँग्रेस नेत्यांची मानसिकता किती वाईट आहे. ते किती खालच्या थराला जाऊ शकतात. राहुल गांधींच्या शब्दांवरुन सिद्ध होतं की, त्यांच्याकडे ना आचार आहेत, ना विचार आणि ना संस्कार. लोकशाहीत एवढ्या खालच्या स्तराचा विरोध केवळ काँग्रेस नेतेच करु शकतात. जसे विचार तसे शब्द," असं राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी म्हटलं.