पणजी: गोव्यामध्ये सध्या सुरु असलेल्या राजकीय नाट्यावरून वेगवेगळ्या स्तरातून टीका होत आहेत. यामध्ये पक्षातील काही लोकांचा देखील समावेश आहे. यात आता राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मुलाच्या नावाचीही भर पडली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त करताना उत्पल यांनी म्हटले आहे की, हे जे घडत आहे ते माझ्या वडिलांच्या विचारांच्या विरोधात घडत आहे. माझे वडील असते तर त्यांनी असा मार्ग निवडला नसता, असे उत्पल पर्रिकर यांनी म्हटले आहे.


उत्पल यांनी म्हटले आहे की, 17 मार्चला माझ्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी तयार केलेला मार्गाचाही अंत झाला. काल गोवावासियांना याची प्रचिती देखील आली. 17 मार्च रोजीच भाजपसाठी विश्वास आणि वचनबद्धता या शब्दांचा अर्थ उरलेला नाही. उत्पल यांनी म्हटले आहे की, वडिलांच्या निधनानंतर गोवा भाजप आता वेगळ्या दिशेने चालली आहे. ज्या मार्गाने भाजप चालली आहे तो निश्चितच योग्य नाही असे त्यांनी म्हटले आहे.


मनोहर पर्रिकर  यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभेच्या  पोटनिवडणुकीसाठी उत्पल पर्रिकर यांना तिकीट न देता सिद्धार्थ कुंकळयेकर यांना तिकीट दिले होते. त्यांचा काँग्रेस उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी पराभव केला होता. आता मोन्सेरात यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेक भाजपवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसपासून फारकत घेतलेल्या दहा आमदारांनी काल दिल्लीत जाऊन भाजपच्या सदस्यत्वाचे अर्ज भरुन रितसर पक्षप्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही त्यांनी भेट घेतली. बाबू कवळेकर, मायकल लोबो, बाबूश मोन्सेरात व फिलीप नेरी रॉड्रीग्ज अशा चौघा भाजप आमदारांचा मंत्री म्हणून आज किंवा उद्या शपथविधी होणार आहे.

बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली दहा आमदार काँग्रेसमधून बुधवारी फुटले. त्यांनी काँग्रेस विधिमंडळ गटाचा दोन तृतीयांश गट भाजपमध्ये विलीन केला. सरकारच्या विधिमंडळ खात्याने हे विलिनीकरण झाल्याचे जाहीर करणारी अधिसूचनाही गुरुवारी जारी केली. काँग्रेसमधील दहा आमदार एकदम पक्षातून बाहेर येण्याची ही दुसरी घटना आहे. दरम्यान कवळेकर यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.



संबंधित बातम्या
काँग्रेसमधून फुटलेले 10 आमदार भाजपमध्ये, चौघं मंत्रिपदाची शपथ घेणार

गोवा मंत्रिमंडळात मोठे बदल अपेक्षित, अनेकांना अर्धचंद्र, बाबू कवळेकर नवे उपमुख्यमंत्री?

गोव्यात काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन