नवी दिल्ली: आपल्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारत जी काही पावले उचलेल त्यामागे अमेरिका खंबीर उभी असेल असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी मंगळवारी केले आहे. ते भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान पार पडलेल्या टु प्लस टू बैठकीच्या चर्चेनंतर घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. गलवानच्या खोऱ्यातील हिंसक घटनेत शहीद झालेल्या भारताच्या जवानांचा त्यांनी उल्लेख केला आणि या प्रश्नावरुन अमेरिका भारतासोबत असल्याचं सांगितले. माईक पॉम्पियो यांनी या आधीही अनेकवेळा चीनच्या विस्तारवादी धोरणावर टीका केली आहे.
अमेरिका आणि भारत या दोन देशांच्या दरम्यान सुरु असलेल्या 'टू प्लस टू' चर्चेच्या तिसऱ्या बैठकीत प्रामुख्याने पूर्व लडाख, इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि जगाच्या इतर भागात चीनने अवलंबलेल्या आक्रमक धोरणावर चर्चा झाली.
गलवानच्या घटनेचा उल्लेख करुन माईक पॉम्पियो म्हणाले की भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आक्रमकतेचा आणि जगातील इतर समस्यांचा मुकाबला करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करतील. या चर्चेदरम्यान दोन देशांत पाच प्रमुख करार झाले. त्यामध्ये बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अॅग्रीमेंट (BECA) हा करारही करण्यात आला. यामुळे आता या दोन देशादरम्यान उच्चस्तरीय तंत्रज्ञान, क्लासिफाईड सॅटलाईट डाटा आणि इतर संवेदनशील माहितीचे आदान प्रदान करण्यात करणे सुलभ होणार आहे.
या बैठकीत चीनच्या विस्तारवादी भूमिकेला तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी आपसातले सहकार्य वाढवावे आणि ज्या प्रदेशात या दोन्ही देशांचे हितसंबंध गुंतले आहेत त्यांचे संरक्षण करणे यावर एकमत झाले आहे.
याप्रसंगी माईक पॉम्पियो यांनी त्यांच्या नॅशनल वॉर मेमोरिएलला दिलेल्या भेटीचाही उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, " आज आम्ही जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिलेल्या जवानांना श्रध्दांजली वाहिली. त्यात गलवानच्या खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांचाही समावेश होतो. भारत स्वातंत्र्य आणि अखंडतेच्या संरक्षणासाठी लढत असलेल्या या लढाईत अमेरिका भारतासोबत आहे.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रसंगी सांगितले की इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देश सहकार्य करतील. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश आंतरराष्ट्रीय समुद्रातील जागतिक नियम, फ्रिडम ऑफ नेव्हिगेशन आणि स्थानिय सार्वभौमत्व आणि अखंडता यांचा आदर करतील आणि इतर देशांशी या प्रश्नावर सहकार्य करतील.
भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की भारत आणि अमेरिका या दोन देशांतील चर्चेचा मुख्य मुद्दा हा इंडो- पॅसिफिक प्रदेश हाच होता. जग जसे बहुध्रुवीय आहे तसेच आशिय़ासुध्दा बहुध्रुवीय असावा या विचारावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. एस जयशंकर यांचा निर्देश चीनच्या विस्तरवादी भूमिकेकडे होता हे स्पष्ट आहे.
अमेरिकन संरक्षण मंत्री मार्क इस्पार यांनीही त्यांच्या भाषणात इंडो-पॅसिफिक प्रदेशातील खुल्या आणि मुक्त धोरणाचे समर्थन केले आहे.
लडाखच्य़ा सीमेवर भारत आणि चीन या दोन देशांत गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिका या दोन देशांत पार पडलेल्या 'टू प्लस टू' चर्चेकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते.