नवी दिल्ली : देशातील कोणताही नागरिक आता जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी आता तेथील नागरिक असण्याची गरज नाही. मात्र तुम्हाला ही जमीन फक्त उद्योग उभारणीसाठी खरेदी करता येऊ शकते अशी अट ठेवण्यात आली आहे. उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतला असून आजपासून हा नियम लागू झाला आहे.


याआधी जम्मू-काश्मीरमध्ये केवळ स्थानिक लोक जमीन खरेदी-विक्री करु शकत असत. केंद्रीय गृह मंत्रालयाने आता जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायद्यांतर्गत असलेल्या जागेबाबत हा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबतचं कलम 370 काढून टाकलं. त्याचबरोबर जम्मू काश्मीर हे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले. या निर्णयाला आता एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. त्यानंतर आता केंद्राने जमीन कायदा बदलला आहे.


जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितलं की, आम्हाला जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरील उद्योग आणायचे आहेत. त्यासाठी औद्योगिक जमिनीमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. परंतु शेतीची केलेली जमीन केवळ जम्मू-काश्मीरमधील जनतेसाठी राहील.