Pm Narendra Modi : जगभरात सध्या अनेक घरामोडी घडत आहेत. त्यामध्ये रशिया-युक्रेन युद्ध, श्रीलंकेतील आर्थिक संकट आणि पाकिस्तानमधील राजकीय उलथापालथ या गोष्टींचा समावेश आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष जो बायडन  ( Joe Biden )  यांच्यात सोमवारी ऑनलाईन बैठक  होणार आहे. उद्या संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान ही बैठक होऊ शकते. दोन्ही नेते सध्याच्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतील तसेच दक्षिण आशिया, इंडो-पॅसिफिकमधील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा होईल. परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी या ऑनलाइन बैठकीबाबत माहिती दिली आहे.


सोमवारी वॉशिंग्टनमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील 'टू प्लस टू' मंत्रिस्तरीय चर्चेच्या चौथ्या सत्रापूर्वी दोन्ही नेत्यांमधील ही ऑनलाइन बैठक होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन व परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्यासोबत  वॉशिंग्टनमध्ये या संवादाच्या चौथ्या सत्रात 11 एप्रिल रोजी चर्चा करतील.


"पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडन दक्षिण आशियातील अलीकडील घडामोडी, इंडो-पॅसिफिक आणि परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील, तसेच बैठकीदरम्यान विद्यमान द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतील," अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबरोबरच "दोन्ही नेत्यांमधील ऑनलाइन बैठक द्विपक्षीय सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने दोन्ही बाजूंना नियमित आणि उच्च-स्तरीय संपर्क सुरू ठेवण्यास सक्षम करेल," असेही निवेदनात म्हटले आहे.


दरम्यान, वॉशिंग्टनमधून मिळालेल्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, "अर्थव्यवस्था आणि आमच्या लोकांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी अध्यक्ष बायडन सोमवारी पंतप्रधान मोदींसोबत ऑनलाइन बैठक घेणार आहेत."


महत्वाच्या बातम्या