Corona Booster Dose : 18 वर्षांवरील सर्वांना आजपासून कोरोनावरील बूस्टर डोस घेता येणार आहे. 18 ते 59 वर्षांच्या नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर सशुल्क कोविड बूस्टर डोस उपलब्ध करण्यात आला आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा डोस आता 225 रुपयांना उपलब्ध करण्यात आला आहे. तर आरोग्य कर्मचारी, 60 वर्षांवरील नागरिक यांना पूर्वीप्रमाणेच सरकारी आणि मनपा केंद्रांवर बूस्टर डोस उपलब्ध होणार आहे. 12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांनाही सरकारी केंद्रांवर विनामूल्य लस उपलब्ध आहे. कोरोनाचं संकट कमी झालं असलं तरी नागरिकांनी लसीकरण करणं महत्त्वाचं आहे. त्यातच चौथी लाट टाळायची असेल तर बूस्टर डोस महत्त्वाचा ठरणार आहे.


आजपासून म्हणजेच, 10 एप्रिलपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना खाजगी लसीकरण केंद्रांमध्ये कोविड-19 लसीचा खबरदारीचा डोस दिला जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही घोषणा केली. मंत्रालयानं सांगितलं होतं की, 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती, ज्यांना 9 महिन्यांसाठी लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे, ते बूस्टर डोससाठी पात्र असतील. पण या डोससाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं? किंवा लस कुठल्या केंद्रांवर उपलब्ध होणार? यांसारखे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. जाणून घेऊयात अशाच काही प्रश्नांची उत्तरं...


बूस्टर डोसबाबात उपस्थित होणार काही प्रश्न... 


बूस्टर डोस म्हणजे काय? 


ज्या व्यक्तींचं वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेता येईल. 


कधी घ्यावा बूस्टर डोस? 


ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत आणि त्यांना दोन्ही डोस घेऊन 9 महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना जवळच्या खाजगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी नोंदणी करु शकतात. 


बूस्टर डोस म्हणून कोणती लस दिली जाणार? 


तुम्हाला आधी ज्या दोन लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्याच लसीचा बूस्टर डोस देण्यात येईल. 


बूस्टर डोससाठी नोंदणी कशी कराल? 


शनिवारी सरकारनं सांगितलं होतं की, बूस्टर डोससाठी कोविन पोर्टलवर पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. कारण पहिल्या दोन लसींसाठी आधीच बुकिंग करण्यात आली होती. 


बूस्टर डोसची किंमत काय? 


सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकनं आपल्या लसींच्या बूस्टर डोसच्या किमती कमी केल्या होत्या. सरकारशी बातचित केल्यानंतर रुग्णालयांमध्ये कोविड-19 लस 225 रुपयांना मिळणार आहे. सरकारनं हेदेखील सांगितलं होतं की, खाजगी लसीकरण केंद्रे सेवा शुल्क म्हणून प्रति डोस 150 रुपये आकारू शकतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha