Sania Mirza Became India's First Muslim Woman Fighter Pilot : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मिर्झापूर (Mirzapur) येथील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने इतिहास रचला आहे. सानियाने फक्त उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशाचा मान वाढवला आहे. सानिया मिर्झा राष्ट्रीय सुरक्षा दलाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. यासोबतच सानिया मिर्झा ही देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट (First Muslim Woman Fighter Pilot) बनण्याच्या तिच्या स्वप्नाच्या आणखी जवळ पोहोचली आहे. नॅशनल डिफेंस ॲकेडमी (NDA - National Defence Academy) म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा दलाची परीक्षा उत्तीर्ण करत सानियाने नेत्रदिपक भरारी घेतली आहे. या भरारीचं सर्वत्र कौतुक होत आहे.


देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट


उत्तर प्रदेशच्या सानिया मिर्झाने एनडीए परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सानियाने एनडीए परीक्षेमध्ये 149 वा क्रमांक मिळवला आहे. यासोबतच सानिया पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट बनणार आहे. सानियाने एनडीएची परीक्षा उत्तीर्ण करत महिलांसाठी असलेल्या 19 जागांमध्ये फ्लाईंग विंगमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. सानिया 27 डिसेंबरपासून पुणे येथे प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहे. प्रशिक्षण आणि इतर गोष्टी योग्य प्रकारे पार पडल्यास सानिया मिर्झा देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट होईल.






सानियाचे वडील आहेत टीव्ही मेकॅनिक


सानिया उत्तर प्रदेशातील मिर्झापूरच्या जसोवर गावात राहते. सानियाचे वडील शाहिद अली टीव्ही मेकॅनिक आहेत. उत्तर प्रदेशच्या माध्यमिक शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर सानियाने फायटर पायलट होण्याचे पाहिलेले स्वप्न पाहिले आता पूर्ण होणार आहे. हिंदी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या सानियाने सांगितले की, हिंदी माध्यमामध्य शिकूनही विद्यार्थीही यश मिळवू शकतात, फक्त तुमचं ध्येय पक्के असायला हवे. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुमच्यासाठी काहीही अवघड नाही. 


देहात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जसोवर या छोट्याशा गावातील सानियाच्या या भरारीचं कौतुक होत आहे. टीव्ही मेकॅनिकच्या मुलीने आपली जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर देशासोबतच उत्तर प्रदेश राज्यालाही मान मिळवून दिला आहे.


गावातच झालं सानिया मिर्झाचं प्राथमिक शिक्षण 


सानिया मिर्झापूर देहाट कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जसोवर या छोट्याशा गावची रहिवासी आहे. गावातीलच पंडित चिंतामणी दुबे इंटर कॉलेजमधून सानियाने दहावीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. ती उत्तर प्रदेश बोर्डाच्या परीक्षेत जिल्हा टॉपर देखील आहे. यानंतर सानियाने शहरातील गुरु नानक गर्ल्स इंटर कॉलेजमधून बारावीचे शिक्षण पूर्ण केले.