UP Heat Wave News : उत्तर भारतात (North India) सध्या उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. अनेक भागात पारा 50 अशं सेल्सिअस जवळ पोहोचण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढतानाच दिसत आहे. या भीषण गरमीमुळे उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उष्णतेच्या लाटेने हे बळी घेतले आहेत. याशिवाय आणखी काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिर्झापूरमध्ये निवडणूक ड्युटीवर असलेल्या एकूण 23 जवानांना विभागीय रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये 20 होमगार्ड, एक अग्निशमन सेवा, एक पीएसी आणि एक पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे 13 जणांचा मृत्यू
उष्णतेच्या लाटेमुळे मिर्झापूरमध्ये 13 जणांचा मृ्त्यू झाल्याच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये 7 होमगार्ड, 5 नागरिक आणि 1 अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे. मिर्झापूरमध्ये उष्माघाताची लाट अद्यापही कायम आहे. निवडणुकीदरम्यान कर्तव्य बजावत असलेल्या 6 होमगार्ड जवानांसह 13 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लिपिक, सफाई कामगार आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. तर अनेक रुग्ण विभागीय रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
6 होमगार्ड जवानांसह 13 जणांचा मृत्यू
याची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांनी ट्रॉमा सेंटर गाठलं. निवडणूक ड्युटीवर असलेल्या एकूण 23 जवानांना विभागीय रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. यामध्ये 20 होमगार्ड, एक फायर कर्मचारी, एक पीएसी आणि एक पोलीस कर्मचारी आहेत. निवडणूक ड्युटी दरम्यान प्रकृती बिघडल्याने सर्वांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मृतांच्या कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कारवाई सुरु आहे. यामागचं नेमकं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
निवडणुकीपूर्वीच उष्माघाताचे बळी
मिर्झापूरमध्ये 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. निवडणुकीपूर्वीच उष्णतेच्या लाटेने 13 जणांचा बळी घेतला आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे लोकसभा निवडणुकीसाठी कर्तव्यावर तैनात असलेल्या 13 निवडणूक कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी उच्च ताप आणि उच्च रक्तदाबामुळे वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या सर्व जवानांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. मिर्झापूर येथील मां विंध्यवासिनी स्वायत्त राज्य वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजबहादूर कमल यांनी सांगितलं की, मृतांमध्ये सात होमगार्ड शिपाई, तीन स्वच्छता कर्मचारी, सीएमओ कार्यालयात नियुक्त एक लिपिक, एक एकत्रीकरण अधिकारी आणि होमगार्ड टीमचा एक शिपाई यांचा समावेश आहे.