Hathras Stampede Incident : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव परिसरात आयोजित सत्संगात चेंगराचेंगरी झाली. मंगळवारी घडलेल्या या दुर्घटनेमध्ये 100 अधिक जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. एटाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश कुमार सिंह यांनी सांगितलं की, ही घटना पुलराई गावात एका सत्संगात घडली. बाबा भोले यांच्या या सत्संगामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. सिकंदरराव पोलीस स्टेशनचे एसएचओ आशिष कुमार यांनी सांगितलं की, चेंगराचेंगरीची घटना जास्त गर्दीमुळे झाली. 


थ्री पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा? (Who Is Bhole Baba)


भोले बाबा (Bhole Baba) यांच्या सत्संगात ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील रतिभानपूर येथे नारायण साकार (Narayan Sakar) उर्फ भोले बाबा यांचा सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. भोले बाबा कोरोनाकाळातील सत्संगामुळे चर्चेत आले होते. त्यांनी कोरोनाकाळात 50 जणांसाठी सत्संगाचं आयोजन करत हजारो लोक गोळा केले होते. तेव्हा या बाबांची जोरदार चर्चा झाली होती. याचं आणखी एक कारण म्हणजे भोले बाबा थ्री पीस सूट घालून मंचावर पत्नीसह सिंहासनावर बसून लोकांना मोह-मायेपासून दूर राहण्याचा उपदेश करतात.


गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून अध्यात्माचा मार्ग


नारायण साकार हरी उर्फ साकार विश्व हरी उर्फ ​​भोले बाबा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात झाला. पटियाली तहसीलमधील बहादूर गावात जन्मलेले भोले बाबा यांचं खरं नाव सूरज पाल. ते स्वतःला इंटेलिजन्स ब्युरो (IB) म्हणजेच गुप्तचर विभागाचे माजी कर्मचारी असल्याचं सांगतात. मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जातो की, 26 वर्षांपूर्वी बाबांनी आपली सरकारी नोकरी सोडली. त्यांनी 1990 मध्ये सरकारी नोकरी सोडून अध्यात्माचा  धार्मिक प्रवचन देण्यास सुरुवात केली. भोले बाबांचे पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, दिल्लीसह देशभरात लाखो अनुयायी आहेत, असं सांगितलं जातं.


ज्यांच्या कार्यक्रमात 100 हून अधिक जणांचा जीव गेला


उत्तर प्रदेशातील हाथरस-एटा सीमेवर सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी आयोजित भोले बाबांच्या सत्संगामध्ये ही दुर्घटना घडली. हाथरस एटा सीमेजवळील रतीभानपूर येथे भोले बाबांचे प्रवचन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. उष्णतेमुळे कार्यक्रमाच्या मंडपामध्ये चेंगराचेंगरी झाली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


भोले बाबांच्या भक्तांवर काळाचा घाला, हाथरसच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू; चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती