नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्य मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचं आज (18 ऑक्टोबर) निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहिलेले एन डी तिवारी मागील वर्षी भाजपमध्ये सामील झाले होते.


राजकीय प्रवास
एनडी तिवारी 1952 मध्ये पहिल्यांदा आमदार बनले. तर 1976 मध्ये त्यांनी पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले तर तीन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. नारायण दत्त तिवारी 1980 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले. इंदिरा गांधींनी त्यांना नियोजन मंत्री बनवलं. यानंतर तिवारी यांनी अर्थ, परराष्ट्र यांसारखी खातीही सांभाळली.

राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होते. परंतु ते निवडणूक हरले आणि सत्तेच्या सर्वात मोठ्या खुर्चीजवळ असतानाही तिथे पोहोचू शकले नाहीत. त्यामुळेच ते काँग्रेसपासून दूर गेले होते. परंतु सोनिया गांधी अध्यक्षा झाल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.

एनडी तिवारींनी इतिहास रचला
2000 मध्ये उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली. तर 2002 मध्येच उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनून तिवारी यांनी इतिहास रचला. दोन राज्यांचे मुख्यमंत्री बनणारे ते एकमेव राजकीय नेते बनले. इतकंच नाही तर  2007 मध्ये एनडी तिवारी आंध्र प्रदेशचे राज्यपालही बनले.

एवढा मोठी राजकीय कारकीर्द असताना एनडी तिवारी अनेक वादांमध्येही अडकले. 2009 एनडी तिवारी सेक्स स्कँडलमध्ये सापडले. एका तेलुगू चॅनलच्या तीन मुलींसोबत त्यांचा फोटो दिसला होता. यानंतर त्यांना राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा भाजपने एनडी तिवारींवर जोरदार हल्ला केला होता.

तिवारींची राजकीय कारकीर्द
तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (1976–77, 1984–85, 1988–89)

1986 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री बनले

2002 मध्ये उत्तराखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते 2002 पासून 2007 पर्यंत मुख्यमंत्रीही होते.

2007 पासून 2009 पर्यंत आंध्र प्रदेशचे राज्यपालही बनले.

2009 मध्ये एका सेक्स स्कँडलमध्ये नाव आल्यानंतर त्यांन राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा लागला.