Uttar Pradesh ST Corporation :  महाराष्ट्रात एसटीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेटला आहे. विलीनीकरणावरून वाद प्रतिवाद सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशच्या रणधुमाळीत एबीपी माझानं यूपीच्या एसटीची चाचपणी केली. उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखी राज्यं आपण सातत्याने कमीच लेखत असतो, पण उत्तरप्रदेश मधल्या एसटी महामंडळा बद्दल विशेष बाब म्हणजे हे देशातलं एकमेव महामंडळ आहे जे फायद्यात आहे. शिवाय लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे उत्तर प्रदेशात 1986 नंतर एसटीचं कुठलेही आंदोलन झालेले नाही.


त्यांचे आणि आपले काही प्रश्न, समस्या समानही आहेत. किंवा हेच मॉडेल आदर्श आहे असेही नाही. पण काय अशी कारणं आहेत की ज्यामुळे उत्तर प्रदेशातले एसटी महामंडळ फायद्यात आहे. उत्तर प्रदेश परिवहन निगमचे रिजनल मॅनेजर पल्लव बोस यांच्याशी बातचीत करून आम्ही काही मुद्दे जाणून घेतले. यातून महाराष्ट्रातलं एसटी महामंडळ आणि यूपीचं एसटी महामंडळं यातला फरक देखील जाणून घेतला. 


महाराष्ट्र एसटी महामंडळाची स्थापना 1960 उत्तर प्रदेश एसटी महामंडळ स्थापना 1972 सालची आहे.  महाराष्ट्रात एसटी एकूण बसेस संख्या जवळपास 19 हजार तर उत्तर प्रदेश एसटी एकूण बसेस संख्या 12 हजार आहे.  महाराष्ट्र एसटी कर्मचारी सुमारे 1 लाखाहून अधिक तर उत्तर प्रदेश एसटी कर्मचारी 45 हजार, त्यातले निम्मे कंत्राटी आहेत.  उत्तर प्रदेशमध्ये बस डेपो 155 आहेत त्यांची लोकसंख्या जवळपास 25 कोटी आहे तर  महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 12 कोटी इतकी आहे.  उत्तर प्रदेशातल्या एसटीमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरचा पगार 35 ते 40 हजार रुपये इतका आहे. 


कंत्राटी कामगारांना उत्तरप्रदेशात कामगिरीनुसार वेतन आहे. उत्तर प्रदेशात एसटी महामंडळाचा पसारा महाराष्ट्रापेक्षा तुलनेने कमी आहे. उत्तर प्रदेशातले काही मार्ग खाजगी वाहतुकदारांसाठी सुद्धा आरक्षित आहेत. ठराविक मार्गावरच यूपीची एसटी चालते. 1986 नंतर उत्तर प्रदेशात एसटीचं कुठलंही आंदोलन नाही.  2009 नंतर इथे पूर्णपणे कंत्राटी पद्धत राबवली गेली.  देशात एकमेव एसटी महामंडळ जे सलग पाच वर्षे फायद्यात आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha