UP Assembly News : विधानसभा निवडणुकीनंतर आज उत्तर प्रदेशच्या विधानभवनात काहीसं हालकं फुलकं वातावरण पाहायला मिळालं. आज उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांना शपथ देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील आमदारकीची शपथ घेतली. दरम्यान, हा सोहळा सुरु होण्यापूर्वी विधानभवनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांनी एकमेकांशी हातमिळवणी करत हस्तांदोलन केलं. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगल यश मिळालं आहे. भाजपने सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी सोहळा आज संपन्न आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पार्टीचे प्रमुक अखिलेश यादव उपस्थित होता. यावेळी दोघांनी विधानभवनात बातचीत करत हस्तांदोलन केल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकानंतर प्रथमच हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याचे पाहायला मिळालं.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमदार म्हणून शपथ आज शपथ घेतली. तर उत्तर प्रदेश विधानसभेचे नवनिर्वाचित सदस्य ब्रजेश पाठक यांनी सभागृह नेते म्हणून शपथ घेतली. प्रोटेम स्पीकर रमापती शास्त्री यांनी त्यांना शपथ दिली. दरम्यान, अखिलेश यादव यांनी देखील आज शपथ घेतली. अखिलेश यादव हे सभागृहातील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली होती. करहाल विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन ते विधानसभेत पोहोचले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने मोदी सरकारमधील मंत्री एसपी सिंह बघेल यांना तिकीट दिले होते. अखिलेश याआधी आझमगडमधून लोकसभेचे खासदार होते. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता ते यूपी विधानसभेत सपा विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून, विरोधी पक्षाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत.
विधानसभा अध्यक्षांची निवडणूक उद्या होणार
उत्तर प्रदेशच्या 18 व्या विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी 29 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. राज्यपालांनी 18 व्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी 29 मार्च ही तारीख निश्चित केली आहे. 29 मार्च रोजी दुपारी तीन वाजता विधानसभा मंडपात निवडणूक होणार असल्याची माहिती विधानसभेचे प्रधान सचिव प्रदीप कुमार दुबे यांनी सांगितली.