मीनाक्षी अम्मा
कलारिपयट्टू ही साहसी कला शिकवणाऱ्या मीनाक्षी अम्मा या एकमेव महिला आहेत. 76 वर्षांच्या मीनाक्षी अम्मा तलवारबाजी, लाठीकाठी आणि उंचीझिल शिकवतात. वयाच्या सातव्या वर्षापासून मीनाक्षी अम्मा यांनी वडिलांकडून हा साहसी खेळ शिकायला सुरुवात केली. गेल्या 68 वर्षांपासून मीनाक्षी अम्मा यांनी कलारिपटट्टूच्या प्रचार आणि प्रसाराचा वसाच घेतला आहे.
जितेंद्र हरपाल
मूळचे उदिशाचे असलेल्या जितेंद्र हरपाल यांना रंगबाती या गाण्यानं नावलौकिक मिळवून दिला. दलित कुटुंबात जन्म झालेल्या हरपाल यांनी गाण्याचं कुठलंही शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नाही. पण तरीही त्यांच्या सुरांना ओडिशासह संपूर्ण देशानं आपलं मानलं. जितेंद्र हरपाल यांना उदिशात मोठा फॅन फॉलोइंग आहे. पद्म पुरस्कारांनाही जितेंद्र हरपाल यांनी आपल्या गायकीची दखल घ्यायला भाग पाडलं.
डॉ. भक्ती यादव
इंदोर मधील पहिली महिला डॉक्टर ही डॉ. भक्ती यादव यांची प्रमुख ओळख. सरकारी नोकरी सोडून मोफत उपचार देण्याचा ध्यास डॉ. भक्ती यादव यांनी घेतला. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील हजारो महिलांची प्रसुती त्यांनी केली. 91 वर्षाच्या डॉ. भक्ती आजही त्याच ऊर्जेने आणि जोमाने रुग्णांची मोफत सेवा करतात.
गिरीष भारद्वाज
ब्रिज मॅन ओळख असलेले गिरीष भारद्वाज पेशाने इंजिनिअर आहेत. नोकरी न मिळाल्याने त्यांनी आपला मोर्चा ब्रिज बांधण्याकडे वळवला. लोकसहभागातून कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील अतिशय दुर्गम ठिकाणी 100 हून अधिक पूल गिरीष भारद्वाज यांनी उभारले. त्यांनी बांधलेल्या सस्पेन्शन पूलनं अनेकांना विकासाचा मार्ग दाखवला. ब्रिज मॅन असलेले गिरीष भारद्वाज देशाचे रिअल हिरो मानले जातात.
दरिपल्ली रामय्या
तेलंगणातील 68 वर्षीय दरिपल्ली रामय्या या अवलियानं कोट्यवधी झाडं लावली आहेत. दरिपल्ली आणि त्यांची अर्धांगिनी जनम्मा खिशात बिया घेऊन हिंडतात, आणि मोकळी जागा दिसली की तिकडे बिजं रोवतात. भूतलावर हरितक्रांती करण्याचा वसाच जणू या दाम्पत्याने घेतला आहे.
करिमल हक
बंगालमध्ये चहाच्या मळ्यातला एक साधा कामगार. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांच्या आईला प्राण गमवावे लागले आणि याच घटनेनंतर करिमल यांनी आपल्या बाईकचं रुपांतर मोफत रुग्णवाहिकेत केलं. धालाबारीमधल्या 20 गावांसाठी त्यांची बाईक म्हणजे जीवनवाहिनी आहे. त्यांच्या बाईक अॅम्ब्युलन्समुळे आजवर 3 हजार रुग्णांचे प्राण वाचले आहेत.
शेखर नाईक
2012 मधील दृष्टीहीन क्रिकेटपटूंच्या टी 20 विश्वचषकाचे कर्णधार शेखर नाईक. त्यांच्या नेतृत्वात अंध क्रिकेट संघाने टी 20 वर्ल्डकपवर नाव कोरलं. पाठोपाठ 2014 मधील दृष्टीहीन क्रीडापटूंचा वनडे विश्वचषकही नाईक यांच्या संघाने पटकावला. आजच्या काळातील दृष्टीहीन क्रिकेटमधील ते सर्वोत्तम क्रिकेटपटू आहेत. 13 वर्षांत त्यांनी 32 शतकं ठोकली आहेत.