UNSC Terror Meet : दहशतवादाचा (Terror Meet In Taj Hotel) खरा चेहरा पाहणाऱ्या ताज हॉटेलमध्ये दहशतवाद संपवण्यासंदर्भात बैठक झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा (UNSC) परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची विशेष बैठक मुंबईत घेण्यात आली. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये सुरू झालेल्या दोन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी मुंबईतील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व पंधरा सदस्य देशांच्या राजदूतांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य आणि संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 26/11 च्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण केले. यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनी दहशतवादावर पाकिस्तानला चांगलेच घेरले. या महत्त्वाच्या बैठकीत दहशतवादाशी मुकाबला करण्याच्या सर्व सूचना आणि पद्धतींवर चर्चा होत आहे.
तीन आव्हानांचा विचार
दरम्यान, दुसऱ्या दिवशीची बैठक राजधानी दिल्लीत होणार आहे. या बैठकांमध्ये चिनी राजनैतिक अधिकारीही सहभागी होणार आहेत. या बैठकीत समिती प्रामुख्याने तीन आव्हानांचा विचार करेल, ज्यात दहशतवादी कारवायांमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर, निधी उभारणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि ड्रोनसारख्या मानवरहित हवाई उपकरणाचा वापर यांचा समावेश आहे.
26/11 चा दहशतवादी हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही. - परराष्ट्र मंत्री
भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी पाकिस्तानवर निशाणा साधताना सांगितले की, 14 वर्षांपूर्वी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. अतिरेकी शेजारच्या देशातून भारतात आले आणि त्यांनी मुंबईला चार दिवस ओलीस ठेवले. शेकडो लोक मरण पावले. शहीद झालेल्या वीरांना आम्ही सलाम करतो. सीएसटी रेल्वे स्टेशन, ताज हॉटेल, छाबर हाऊस, कामा हॉस्पिटल, ओबेरॉय हॉटेलवर झालेला हल्ला हा जगातील मानवतेवर झालेला हल्ला होता. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि मुख्य दोषींना अद्याप शिक्षा झालेली नाही. 26/11 चा दहशतवादी हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही.
नवी दिल्लीत दुसऱ्या दिवशीची बैठक
या बैठकीत अल्बेनिया, ब्राझील, चीन, फ्रान्स, गॅबन, आयर्लंड, केनिया, मेक्सिको, नॉर्वे, रशिया, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि भारत या देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेव्हरली, गॅबॉनचे परराष्ट्र मंत्री मायकल मूला अॅडमो आणि इतर देशांचे परराष्ट्र मंत्री भारतातील संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीच्या परिषदेत सहभागी झाले आहेत. 29 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत दुसऱ्या दिवशीची बैठक होणार असून त्यात तीन मुद्यांवर आधारित अजेंड्यावर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये दहशतवाद्यांकडून माहिती आणि दळणवळण, तंत्रज्ञानाच्या आणि इंटरनेटचा गैरवापर, दहशतवाद्यांकडून नवीन पेमेंट पद्धती आणि ड्रोनसह मानवरहित वाहनांचा वापर यावर चर्चा होईल.
राजकीय मतभेद विसरून दहशतवादाच्या लढाईत एकत्र यावं लागेल - परराष्ट्र मंत्री
भारतीय परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, राजकीय मतभेद विसरून दहशतवादाच्या लढाईत आपल्याला एकत्र यावे लागेल. दहशतवाद हे पूर्णपणे वाईट आहे. ते पुढे म्हणाले- दहशतवाद हा सर्वांनाच धोका आहे. आंतरराष्ट्रीय शांततेला आणि मानवतेला याचा धोका आहे. एस जयशंकर म्हणाले की, यूएनएससीने सीमेवरील दहशतवादाचा एकाच शब्दात निषेध केला. सर्व प्रकारचे दहशतवादी हल्ले अस्वीकार्य आहेत. 26/11 चे मुख्य आरोपी आणि दोषी मुक्त आहेत आणि त्यांना सुरक्षा कवच मिळाले आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, मला याच मुद्द्यांकडे लक्ष वेधायचे आहे