UWW on Wrestlers Protest : कुस्तीपटूंचं (Wrestlers Protest News) लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची अजूनही केंद्र सरकारनं दखल घेतलेली नाही. मात्र जागतिक कुस्ती महासंघानं या आंदोलनाची दखल घेतली असून भारतीय कुस्ती महासंघटनाच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 


कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेऊन हीन वागणूक देणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक पद्धतीनं चौकशी केली जावी. त्याचबरोबर 45 दिवसांत कुस्तीगीर महासंघाची नव्यानं निवडणूक घ्यावी, नाहीतर भारतीय कुस्तीगीर महासंघ बरखास्त केली जाईल, असा इशारा जागतिक कुस्ती महासंघानं दिला आहे. 


देशासाठी पटकावलेली पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला आणि देशासह जगभरात खळबळ माजली. दरम्यान, याप्रकरणात कुस्तीच्या सर्वात मोठ्या संघटनेनं उडी घेतली आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) नं भारतीय कुस्ती महासंघ (WFI) च्या निवडणुका 45 दिवसांच्या आत घेतल्या नाहीत तर WFI पुढील सामन्यांसाठी बरखास्त करु, असा थेट इशाराच जागतिक कुस्ती महासंघानं घेतला आहे. 


WFI बरखास्त झालं तर... 


UWW नं WFI बरखास्त केलं तर मात्र भारतीय खेळाडूंना पुढच्या स्पर्धा भारतीय ध्वज घेऊन खेळता येणार नाही. म्हणजेच, कोणताही कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय ध्वज घेऊन सहभागी होऊ शकणार नाही. 


कुस्तीपटूंच्या प्रश्नावर UWW आयोजित करणार बैठक 


कुस्तीपटूंनी पुकारलेलं आंदोलन आणि बृजभूषण यांच्यावर करण्यात आलेले आरोप, याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी तसेच, कुस्तीपटूंच्या सुरक्षिततेबाबत बोलण्यासाठी UWW एक बैठक आयोजित करणार आहे. तसेच, जागतिक कुस्ती महासंघ भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि WFI च्या एड-हॉक कमेटीकडे सामान्य समिती स्थापन करण्याची विनंतीही करणार आहे. 


कुस्तीपटूंकडून वारंवार होणाऱ्या आरोपांबाबतच्या चौकशीबाबत व्यक्त केली खंत 


UWW नं कुस्तीपटूंना दिलेली वागणूक आणि त्यांना ताब्यात घेतल्याचा निषेध केला आहे. यासोबतच UWW नं याप्रकरणी करण्यात आलेली आतापर्यंतची चौकशीबाबत निराशा व्यक्त केली आहे. UWW नं संबंधित अधिकाऱ्यांना या आरोपांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची विनंती केली आहे.