Tiruvanantpuram: केरळ सरकारच्या एजन्सीने मंगळवारी (30 मे) राज्याच्या राजधानीतील, म्हणजेच तिरुवनंतपुरम येथील प्रत्येक छताला सौर ऊर्जा निर्मिती केंद्रात रूपांतरित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला. केरळ सरकार-संचलित एजन्सी फॉर न्यू अँड रिन्युएबल एनर्जी रिसर्च टेक्नॉलॉजी (ANERT) ने आज तीन दिवसीय एक्स्पोचे उद्घाटन केले, जिथे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गेल्या वर्षी सुरू केलेल्या केंद्र सरकारच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केलेले विविध सौर ऊर्जा प्रकल्प (Solar Energy Project) पाहता येतील आणि खरेदी करता येतील.


एएनईआरटीचे संचालक नरेंद्र नाथ वेल्लुरी यांनी पीटीआयला सांगितले, शहरी सौर ऊर्जेचे उद्दिष्ट हे शहराच्या सर्व प्रकारच्या उर्जेच्या गरजा अक्षय उर्जा (Renewable Energy) स्त्रोतांपासून पूर्ण करणे आहे. तिरुवनंतपुरममध्ये 800 मेगावॅट सौर उर्जेची क्षमता ओळखली असल्याचं ते म्हणाले. सौर पॅनल बसवण्यासाठी योग्य तीन लाख इमारती त्यांनी ओळखल्या आहेत. त्यापैकी, 600 सरकारी इमारतींमध्ये सौर पॅनेल बसवण्याचे काम सुरू झाले आहे, त्यापैकी 150 सौर पॅनेल मंगळवारी (30 मे) कार्यान्वित करण्यात आले.


वेल्लुरी पुढे म्हणाले की, ज्या तीन लाख खाजगी इमारती सौर पॅनल बसवण्यासाठी  योग्य आहेत तिथे राहणाऱ्या लोकांनी पुढाकार घेतल्यास 700 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण होऊ शकते. उर्वरीत 100 मेगावॅट हे सौर पथदिवे आणि सरकारी संस्थांवर बसवलेल्या सौर पॅनेलद्वारे निर्माण करता येईल, असंही ते म्हणाले.


महाराष्ट्रात सौर ऊर्जेबाबत फक्त आश्वासनं?


महाराष्ट्र सरकार पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना सौर पंपांचं वाटप करणार होती. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच यासंदर्भात घोषणा केली होती. ताज्या अपडेटनुसार, महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत पाच लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याची योजना अजूनही आखत आहे.


महाराष्ट्र राज्यात सौरऊर्जा पार्क (Solar Energy Park) उभारण्यासाठी महानिर्मितीच्या एनटीपीसीसह कंपनी स्थापण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंतचे अल्ट्रामेगा  सौर ऊर्जा पार्क विकसित करण्याकरता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महानिर्मिती) 50:50 या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे, असं सांगण्यात आले. ही संयुक्त  कंपनी राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करणार आहे. पण खऱ्या अर्थाने सौर ऊर्जेच्या विविध योजना महाराष्ट्रात कधी सुरू होणार? हा प्रश्नच आहे.


हेही वाचा:


Wrestlers Protest: कुस्तीपटूंचा गंगेत पदकं विसर्जित करण्याचा निर्णय मागे; शेतकरी नेत्यांनी काढली कुस्तीपटूंची समजूत