Union Ministry of Finance : पणजीत आज (10 जून) 'बाजारातून संपत्ती निर्माण' या विषयावर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयांतर्गत असलेल्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या बंगळुरुमधून परिषदेत सहभागी होणार आहेत. 75 शहरांमध्ये या परिषदेचं आयोजन केलं जाणार आहे. 


आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी परिषदेचं आयोजन


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग देशभरातील 75 शहरांमध्ये 'बाजारातून संपप्तती निर्माण' या संकल्पनेवर आधारित परिषदेचे आयोजन करणार आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट देशाच्या 75 शहरांमधील नागरिकांना गुंतवणूक आणि संपत्ती निर्माण करण्याबद्दल तसेच नागरिकांचा आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांबद्दल माहिती देणे. तसेच प्रोत्साहन देणं आणि सक्षम करणं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन परिषदेसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरु येथून सहभागी होणार आहेत. तर, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड विज्ञान भवन, नवी दिल्ली येथून सहभागी होणार आहेत.


75 ठिकाणांवर आर्थिक विषयावरील तज्ज्ञांचे 'या' विषयांवर मार्गदर्शन होणार 


गेल्या 75 वर्षांतील भारतीय भांडवली बाजाराची वाढ.
स्वतंत्र गुंतवणूकदार म्हणून महिलांचा उदय.
बाजारपेठेचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी सरकार आणि बाजारातील इतर घटकांची भूमिका.
आर्थिक साक्षरता, आर्थिक समृद्धीचा मार्ग.
अमृत काळात भारतीय भांडवल बाजाराचे भवितव्य
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया आणि देशातील इतर आघाडीच्या वित्तीय संस्थांमधील प्रख्यात वक्ते, आर्थिक साक्षरता आणि आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग या विषयावर पणजी कन्व्हेन्शन सेंटर येथे दुपारी तीन वाजल्यापासून माहितीसत्रास प्रारंभ होईल. जास्तीत जास्त नागरिकांनी परिषदेत सहभागी होऊन वित्तीय बाजार आणि गुंतवणूकीबद्दल माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आलं आहे.


हा महोत्सव जनउत्सव म्हणून साजरा केला जाणार 


देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि भारतीय लोक, संस्कृती आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहासाच्या स्मरणार्थ देशात 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. 5000 वर्षांपेक्षा अधिक प्राचीन इतिहासाचा वारसा असलेल्या आपल्या देशाचा, सामूहिक कामगिरीचा हा उत्सव आहे. हा उत्सव पंतप्रधानांनी सांगितलेल्या पंचसूत्रीवर आधारित आहे. जन-भागीदारीच्या भावनेतून हा महोत्सव जनउत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने  लोकांमध्ये चांगल्या आणि सुलभ स्वीकार्हतेसाठी 75 शहरांमध्ये सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.