Sidhu Moose Wala Case : इंटरपोलने गँगस्टर सतींदरजीत सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रार  याने स्वीकारली आहे. गोल्डी ब्रार सध्या कॅनडात असल्याचे बोलले जात आहे. 


पंजाब पोलिसांनी गोल्डी ब्रारविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी केली होती. गोल्डी ब्रार सध्या कॅनडात लपून बसला असून तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय सदस्य आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीने एका कथित फेसबुक पोस्टद्वारे सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.




फरीदकोटमध्ये दाखल झालेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ​​गोल्डी ब्रार याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती करण्यात आली होती. पंजाब पोलिसांनी या संदर्भात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे 19 मे रोजी प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर 10 दिवसांनी मुसेवाला यांची हत्या झाली.    रेड कॉर्नर नोटीसमुळे ब्रार याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होईल, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले.


श्री मुक्तसर साहिबचा रहिवासी असलेला ब्रार 2017 मध्ये विद्यार्थी व्हिसावर कॅनडाला गेला होता. ब्रार याच्यावर नोव्हेंबर 2020 आणि फेब्रुवारी 2021 मध्ये खून, खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी विकी मिड्डूखेडा याची हत्या झाली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी मुसेवाला यांची हत्या करण्यात आली होती.


रेड कॉर्नर नोटीस म्हणजे काय?


रेड कॉर्नर नोटीस परदेशात पळून गेलेल्या व्यक्तीला अटक आणि ताब्यात घेण्याची परवानगी देते. ज्याच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल झाला आहे, अशा व्यक्तीला शोधण्यासाठी किंवा तात्पुरती अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी केली जाते.  


महत्वाच्या बातम्या


Sidhu Moose Case : शार्प शूटर महाकाल उलगडणार मुसेवालांच्या हत्येचं रहस्य? पंजाब पोलिसांकडून चौकशी