Reaction on Jack Dorsey Claim: ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी मोदी सरकारबद्दल केलेल्या अनेक खळबळजनक दाव्यानंतर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जॅक डोर्सी यांनी केलेले दावे खोटे आहेत', असं केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी 'शेतकरी आंदोलनादरम्यान सकरारवर टीका करणाऱ्या रोखण्यासाठी अनेक अकांऊट ब्लॉक करण्याचा दबाव मोदी सरकारकडून ट्विटरवर टाकण्यात येत होता', असा दावा केला आहे. 


राजीव चंद्रशेखर यांच्याकडून प्रत्युत्तर


जॅक डोर्सी यांच्या दाव्याला केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी प्रत्यत्तर दिलं आहे. राजीव चंद्रशेखर ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'जॅक डोर्सी हे साफ खोटं बोलत आहेत. कदाचित ट्विटरच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना मिटवून टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जॅक डॉर्सी आणि त्यांच्या टीमने अनेकदा भारतीय कायद्यांचं उल्लंघन केलं आहे. खरंतर ट्विटरकडून 2020 ते 2022 दरम्यान कोणत्याही भारतीय कायद्याचं पालन करण्यात आलं नाही. परंतु अखेर जून 2022 पासून ट्विटर भारतीय कायद्यांचं पालन करु लागला. परंतु या दरम्यान कोणत्याही ट्विटरच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही किंवा ट्वटिरवर बंदी देखील घालण्यात आली नाही.' जॅक डोर्सी यांच्या कार्यकाळात ट्विटरला भारतीय कायद्यांचं पालन करण्यास अडचणी होत्या असा थेट आरोप राजीव चंद्रशेखर यांनी जॅक डोर्सी यांच्यावर केला आहे. 






काँग्रेसचे मोदी सरकारवर टीकास्त्र


जॅक डोर्सी यांच्या दाव्यामुळे राजकिय वर्तुळातून आता बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून केंद्र सरकरावर चांगलाच निशाणा साधला जात आहे. काँग्रेसकडून देखील ट्विट करत मोदी सरकार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. काँग्रेसने ट्विट करत म्हटलं की, 'जेव्हा आपले शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी दिल्लीच्या सीमेवर बसले होते, तेव्हा त्यांच्या बातम्या दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. ट्विटरला धमक्या दिल्या जात होत्या. या आंदोलनात 733 शेतकरी शहीद झाले आणि त्यांनंतर सरकारकडून त्यांची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न केला जात होता.' 






दरम्यान काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, 'जेव्हा देशातील शेतकरी त्यांच्या हक्कासाठी लढत होते तेव्हा पंतप्रधान मोदींकडून त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता.' 


देशाची लोकशाही धोक्यात आहे - राऊत


यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, 'देशाची लोकशाही, स्वातंत्र्यता कशा प्रकारे धोक्यात आहे त्याचप्रमाणे कशा प्रकारे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे हे यावरुन लक्षात येईल, असा आरोप राऊतांनी सरकारवर केला आहे.' 


महत्त्वाच्या इतर बातम्या :  


'शेतकरी आंदोलनादरम्यान भारत सरकारची धमकी', माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा खळबळजनक दावा