नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते मंगळवारी (22 ऑगस्ट) नवी दिल्लीत ‘भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम’ (Bharat NCAP) लाँच करण्यात आला आहे. या अंतर्गत आता भारतीय कंपन्यांच्या कार किती सुरक्षित आहे हे पडताळण्यासाठी भारतातच क्रॅश टेस्टिंग सुरु केली जाणार आहे. देशातील कार किती सुरक्षित आहेत? कोणत्या कंपन्यांच्या कार सुरक्षित आहेत आणि कोणत्या नाही? हे आजवर परदेशात ग्लोबल एनकॅपकडून ठरवलं जात होतं. पण आता कारची सेफ्टी टेस्ट घेणं अधिकच सुलभ होणार आहे.


सेफ्टी रेटिंगच्या आधारे करता येणार कार खरेदी


टाटाच्या कारने पहिल्यांदा देशातील पहिली फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग असलेल्या कारचा किताब मिळवला होता. फाईव्ह स्टार रेटिंग मिळाल्याने टाटा नेक्सॉन (TATA Nexon) कारचा खप चांगलाच वाढला होता. आता देशात जवळपास 10 च्यावर कार या फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या आहेत. भारत NCAP मुळे वाहनांच्या अपघात सुरक्षेचं तुलनात्मक मूल्यांकन करणं सोपं जाणार आहे. म्हणजेच, एखादा ग्राहक कार घेताना गाड्यांच्या सेफ्टी रेटिंगच्या आधारे कोणती कार घ्यायची, हे ठरवू शकेल.


अपघातांचं प्रमाण वाढल्याने गाड्यांची सुरक्षा तपासणं अनिवार्य


आतापर्यंत कारच्या सेफ्टीची रेटींग करणारी ही क्रॅश टेस्ट परदेशात केली जात होती, आता ती भारतातच होणार आहे. अलीकडे नवी कार विकत घेताना ग्राहक तिचं मायलेज, स्पीड यापेक्षाही अधिक ती कार प्रवासासाठी किती सुरक्षित आहे? हे पाहतात. बदलत्या जीवनशैलीमुळे आता अपघातांचं प्रमाणही खूप वाढलं आहे आणि त्यामुळे आता वाहनांची सेफ्टी अधिक महत्त्वाची झाली आहे. आपली कार किती सेफ आहे? हे ठरवण्यासाठी भारत एनसीएपी (Bharat NCAP) प्रोग्राम उपयुक्त ठरणार आहे.


भारतीय कार जागतिक बाजारपेठेतही ठरणार दर्जेदार


सुरक्षित कारची मागणी वाढत असल्याने भारत एनसीएपी (Bharat NCAP) द्वारे कार उत्पादकांना ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. भविष्यात उच्च सुरक्षा मानकांचं पालन केल्यामुळे भारतीय कार जागतिक बाजारपेठेत अधिक चांगली स्पर्धा करू शकतील, अशीही अपेक्षा आहे. यामुळे कार उत्पादकांची निर्यात क्षमता वाढेल आणि देशात सुरक्षा संवेदनशील कार बाजारपेठ विकसित होईल.


कार क्रॅश टेस्टींग म्हणजे नक्की काय?


कार क्रॅश टेस्टींगमध्ये वाहनांना त्यांच्या सुरक्षा फिचर्सनुसार 0 ते 5 स्टार रेटिंग दिली जातात. त्यानुसार, कार विकत घेताना सेफ्टी फीचर्स पाहून ग्राहक सुरक्षित वाहन खरेदी करत असतो. आता देशातच रस्ते वाहतूक मंत्रालयाने क्रॅश टेस्ट करून वाहनांना सेफ्टी रेटिंग देण्यासाठी पॅरामीटर निश्चित केलं आहे आणि भारत एनसीएपी (Bharat NCAP) प्रोग्राम लाँच केला आहे.


कसं कार्य करणार Bharat NCAP?



  • गाड्यांना GNCAP प्रमाणे एडल्ट आणि चाइल्ड सुरक्षा रेटिंग दिलं जाणार आहे.

  • यावरून अपघाताच्या वेळी कार आणि त्यात बसलेल्या लोकांचं किती नुकसान होऊ शकतं? हे कळण्यास मदत होईल.

  • कारची क्रॅश चाचणी 5 टप्प्यांत केली जाणार आहे.

  • कारला प्रत्येक स्तरावरील चाचणीसाठी गुण दिले जातील आणि त्याच्या आधारे अंतिम रेटिंग निश्चित केलं जाईल.


Bharat NCAP मुळे कंपन्यांना काय फायदा?



  • भारतातील वाहन कंपन्यांच्या वाहनांची चाचणी देशातच केली जाणार आहे, त्यामुळे वाहनं परदेशात पाठवण्याचा कंपन्यांचा खर्च वाचेल.

  • कार लाँच होण्याआधीच कंपन्या त्यांच्या कारची चाचणी घेऊ शकतील, जेणेकरून ग्राहकांना त्यांना हव्या असलेल्या कारच्या सुरक्षिततेच्या रेटिंगबद्दल माहिती आधीच मिळू शकेल.


ग्राहकांना काय फायदा?



  • ग्राहकांना सुरक्षित कार निवडणं सोपं जाणार आहे.

  • देशातच चाचणी होत असल्याने गाड्यांना लवकरात लवकर रेटिंग मिळणार आहे.

  • भारतात ही चाचणी सुरू झाल्यामुळे कंपन्या आता अधिक सुरक्षित वाहन निर्मितीवर भर देणार आहेत.


टोयोटा कंपनीने दिली Bharat NCAP वर प्रतिक्रिया


भारत एनसीएपी (Bharat NCAP) प्रोग्रामवर टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या कार्यकारी उपाध्यक्षांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरचे (Toyota Kirloskar Motor) कंट्री हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी म्हणाले, “भारत-एनसीएपी प्रोग्रामच्या सरकारच्या निर्णयाचं आम्ही कौतुक करतो आणि ते योग्य दिशेनं टाकलेलं पाऊल असल्याचं ठामपणे मानतो. हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा ग्राहक सुरक्षिततेची सर्वोच्च मानकं पाहत आहेत आणि सुरक्षित वाहनं शोधत आहेत आणि मगच वाहन खरेदीचे निर्णय घेत आहेत. ग्राहकांना सशक्त करण्यासोबतच, हे त्यांना गाड्यांच्या तुलनात्मक सुरक्षा पैलूंची माहिती देऊन अधिक जागरूकता आणि अधिक पारदर्शकता आणण्यास मदत करेल."


पुढे ते असंही म्हणाले की, "टोयोटा कंपनीच्या गाड्यांबद्दल बोलायचं झालं तर आमच्यासाठी माणसाचं जीवन महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे गाड्यांची सुरक्षितता हा पैलू आम्ही सर्वप्रथम लक्षात घेतो. आमच्या गाड्या सर्व सेफ्टी फिचर्सची पूर्तता करतात, याची खात्री करण्यासाठी आतापर्यंत आम्ही नेहमीच सर्व उपाययोजना केल्या आहेत. पुढेही आम्ही हा दृष्टीकोन अवलंबत राहू ज्यामध्ये प्रगत वैशिष्ट्यांसह, अधिक सुरक्षित कार बनवण्यावर आमचं लक्ष केंद्रित असेल.”


हेही वाचा:


Tata Nexon Facelift 2023 : Tata Nexon फेसलिफ्ट या वर्षी सप्टेंबरमध्ये होणार लॉन्च; 'हे' असतील कारचे बेस्ट फीचर्स


Car loan Information:

Calculate Car Loan EMI