Nitin Dadkari : टेस्ला कारचे (Tesla Car ) भारतात उत्पादन करायचे असेल तर आमच्याकडे सर्व क्षमता आणि तंत्रज्ञान आहे. परंतु, या कारचे उत्पादन चीनमध्ये करायचे आणि विक्री भारतात कारायची हा प्रस्ताव योग्य नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. 


नितीन गडकरी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांना टेस्ला कारचे भारतात उत्पादन करण्याची ऑफर दिली आहे. चीनमध्ये तयार केलेल्या टेस्ला कारची भारतात विक्री करण्यापेक्षा भारतातच त्याचे उत्पादन करावे असे गडकरी यांनी म्हटले आहे.   


गडकरी म्हणाले, मस्क यांना मी विनंती करतो की त्यांनी भारतातच टेस्ला कारचे उत्पादन सुरू करावे. भारत ही मोठी बाजारपेठ आहे. येथे बंदरे देखील आहेत. भारतातून कारची इतर देशात निर्यात करू शकता. टेस्लाचे भारतात स्वागत आहे. परंतु,चीनमध्ये उत्पादन करून ते भारतात विकायचे असेल तर ते भारतासाठी चांगले नाही. आम्ही त्यांना भारतात येऊन उत्पादन करण्याची विनंती करतो."






गेल्या काही दिवसांपासून टेस्ला कंपनी करात सूट देण्यात यावी अशी मागणी भारत सरकारकडे करत आहे. परंतु, त्यांची ही मागणी सरकारकडून अनेकवेळा फेटाळण्यात आली आहे. याबरोबरच टेस्लाची ही मागणी पूर्ण करता येणार नसल्याचे देखील सरकारकडून सांगण्यात आले. 


मस्क यांची टेस्ला कंपनी आपली वाहने भारतात आयात करू इच्छित असून त्यासाठी त्यांना करात सूट हवी आहे. परंतु, कंपनीने त्यांची वाहने भारातात आयात करण्याऐवजी स्थानिक पातळीवर वाहने तयार करावीत, असे भारत सरकारचे म्हणणे आहे.


दरम्यान, मस्क आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर यांच्यातील खरेदी करण्याचा करार जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आला आहे. ट्विटरच्या बोर्डाने मस्क यांची 44 अब्ज डॉलरची खरेदी बोली स्वीकारली आहे.